पुणे -पुणे महापालिकेचा क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान समारंभ आज येथे संपन्न झाला यावेळी ३७ खेळाडूंना ८७ लाख २० हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

महानगरपालिका क्रीडा विभागाच्या अंर्तगत सुधारीत क्रीडा धोरणानुसार खेळाडूंसाठी विविध १८ योजना राबवण्यात येत आहेत. यामधील उदयोन्मुख खेळाडूंसाठी क्रीडा शिष्यवृत्ती अंतर्गत त्यांना स्पर्धा साहित्य खरेदी किंवा स्पर्धेच्या तयारीसाठी ठराविक रक्कम धनादेशाद्वारे आदा करण्यात येते.
सन २०२४-२५ या वर्षाकरीता खेळाडूंना शिष्यवृत्ती देणेकामी क्रीडा विभागाकडून जाहिरात देण्यात आली होती. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून एकूण ७४३ खेळाडूंनी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३४४ खेळाडू शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र खेळाडूंना एकूण ८७,२०,०००/- इतक्या रकमेचे धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण समारंभ आज दि.२९/०५/२०२५ रोजी सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला .
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, यांच्यासह उप आयुक्त (प्राथमिक शिक्षण विभाग)आशा राऊत, उप आयुक्त (मालमत्ता व व्यवस्थापन) श्रीमती प्रतिभा पाटील, मुख्य कामगार अधिकारी नितिन केंजळे , क्रीडा अधिकारी प्राथ. शिक्षण विभाग माणिक देवकर इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश परदेशी यांनी केले तसेच क्रीडा विभागाच्या विविध योजना व क्रीडा विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामांबाबत क्रीडा विभागाच्या उप आयुक्त किशोरी शिंदे यांनी माहिती दिली. आशा राऊत यांनी मनपा शिक्षण विभागाच्या ३७ खेळाडूंना शिष्यवृत्ती दिल्याबद्दल आभार मानले, तसेच या वर्षी १०० हुन अधिक शिक्षण विभागाकडील खेळाडू विविध स्पर्धामध्ये प्राविण्य प्राप्त करतील असे सांगितले. आंतरराष्ट्रीय खेळाडू सिद्धार्थ कांबळे आणि राष्ट्रीय खेळाडू सुचिता खरवंडीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मनपाचे आभार मानले. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचून स्पर्धा जिंकण्यासाठी खेळाडू अथक प्रयत्न करतो, त्याच्या या प्रयत्नांना आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक असून पुणे मनपा क्रीडा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून खेळाडूंना आर्थिक सहाय्य करीत आहे. अति. महापालिका आयुक्त यांनी क्रीडा नर्सरी व स्पोर्ट्स रिहॅब सेंटर सुरु करणेकरीता क्रीडा विभाग प्रयत्नशील असून क्रीडा नर्सरी प्रकल्प सुरू करणेस महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झाली आहे असे सांगितले.
क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम अत्यंत आनंदमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करून खेळाडू व पालकांना गौरविण्यात आल्याबद्दल सर्व खेळाडू व पालकांनी पुणे महानगरपालिकेचे आभार व्यक्त केले.

