पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला म्हाळुंगे टीपी स्कीम प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या योजनेला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद असून, त्यांनी योजनेस आपली मान्यता दिली आहे, अशी माहिती अमोल बालवडकर यांनी दिली आहे.
बालवडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या विनंती पत्रात नमूद केले आहे की, या योजनेचा आराखडा लवकरात लवकर तयार होऊन त्याला अंतिम मान्यता मिळावी, जेणेकरून विकासकामांना गती मिळू शकेल.पीएमआरडीएच्या माध्यमातून या योजनेवर गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे अद्याप योजनेस अंतिम मान्यता मिळालेली नाही. परिणामी, या भागातील रस्ते, पाणीपुरवठा व अन्य मूलभूत सुविधा आणि अन्य विकासकामे प्रलंबित आहेत.
बालवडकर यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक अडचणी दूर करून या योजनेला तातडीने अंतिम मान्यता द्यावी, जेणेकरून संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलेल आणि सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल.”या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास परिसराचा एकात्मिक आणि नियोजित विकास सुनिश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

