पुणे-माझ्या मुलीवर आरोप करणाऱ्या वकिलांना देखील मुली-बाळी असतील. आता माझे लेकरु तर गेले आहेच. मात्र, तीच्यावर एवढे वाईट शिंतोडे उडवू नका, अशा शब्दात वैष्णवी हगवणेचे वडिल अनिल कस्पटे यांनी हात जोडून विनंती केली आहे. माझ्या लेकराची अशी बदनामी करु नका, असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळले आहेत.वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी केलेले सर्व दावे तीचे वडिल अनिल कस्पटे यांनी फेटाळून लावले आहेत. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी हगवणे कुटुंबावर अनेक आरोप केले. तसेच माझ्या मुलीच्या खुनात नीलेश चव्हाण यांचा जवळचा संबंध असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
या संबंधी बोलताना कस्पटे म्हणाले की, वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेणे हे चुकीचे आहे. मोबाईल मधील चॅट बाबत आम्हाला कोणतीही पुसटशीही कल्पना कोणीच दिलेली नाही. उलट माझ्या जावयाला मी एक लाख 52 हजार रुपयांचा मोबाईल घेऊन दिला. त्याची पावती देखील कस्पटे यांनी दाखवली आहे. या मोबाईलचे हप्ते मी आजही फेडत असल्याचे ते म्हणाले.हगवणे कुटुंबाकडे पाच कोटी रुपयांच्या गाड्या असल्याचा दावा वकिलांनी न्यायालयात केला होता. मात्र हा दावा कस्पटे यांनी फेटाळून लावला आहे. त्यांच्याकडे केवळ एकच स्फोर्ड कंपनीची गाडी असून मी दिलेली फार्च्युनर गाडी त्यांनी मागितली होती. मी आधी दुसरी गाडी बुक केली होती. मात्र त्यांना फार्च्युनर गाडी हवी होती. मला तीच द्या नसता मी गाडीला हाथ लावणार नाही, असे त्यांनी मला सांगितले होते. त्यानंतर फार्च्युनर गाडी बुक केली असल्याचा दावा कस्पटे यांनी केला आहे.
हगवणे यांनी वैष्णवीची दोन लग्न मोडली असल्याचा दावा देखील पुन्हा एकदा कस्पटे यांनी केला आहे. मात्र या विषयी मी सध्या काही जास्त बोलू शकत नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कस्पटे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून कस्पटे यांनी हगवणे परिवाराकडून आम्हाला धमकवले जात असल्याचा अरोप पुन्हा एकदा केला आहे.
आपली सून मयत झाली हे सोडून हगवणे यांना बाळाला नीलेश चव्हाणकडे देणे कसे सुचले? असा प्रश्न कस्पटे यांनी उपस्थित केला. बाळ वैष्णवीच्या जवळच घरात होते. मग ते बाळ नीलेश चव्हाणकडे कसे पोहोचले? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. नीलेश चव्हाण देखील माझ्या वैष्णवीच्या खुनाच्या कटात सामील आहे, असा माझा ठाम आरोप असल्याचे कस्पटे यांनी म्हटले आहे.

