वर्षानुवर्षे पुराने बाधित होणाऱ्या कुटुंबियांची ससेहोलपट थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय केली ते दाखवा – संदीप खर्डेकरांची आयुक्तांकडे मागणी.
पुणे- धरणातून विसर्ग केल्यावर पुराचे पाणी शिरणाऱ्या ठीक ठिकाणी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाहीर करा,वर्षानुवर्षे पुराने बाधित होणाऱ्या कुटुंबियांची ससेहोलपट थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय केली ते दाखवा अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्त्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि,’ या वर्षी पाऊस 106% पडणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
सालाबादप्रमाणे धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यावर नदीपात्रालगत च्या इमारतींमध्ये किंवा वस्त्यांमध्ये पाणी शिरणार आणि मग “नेमीची येतो मग पावसाळा” ह्या काव्यपंक्ती प्रमाणे मनपा पुरामुळे बाधितांची कोणत्यातरी शाळेत व्यवस्था करणार, त्यांना जेवण, कपडे व इतर गोष्टी उपलब्ध करणार, अनेक स्वयंसेवी संस्था व राजकीय सामाजिक कार्यकर्ते त्यांना माणुसकीच्या नात्याने संसारोपयोगी साहित्याची मदत करणार, पाणी ओसरले की बाधित कुटुंब पुन्हा आपल्या घरी जाणार आणि मग पुढच्या वर्षीचा पाऊस, धरणातून विसर्ग, बाधित कुटुंबियांचे तात्पुरते स्थलांतर हे चक्र सुरूच राहणार.मी ह्या निवेदनाद्वारे आपणास आग्रही मागणी करत आहे की ” हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी प्रशासनाने काही कायमस्वरूपी योजना केली असेल तर त्याचा तपशील जाहीर करावा, त्यातील काही अडचणी असतील तर त्या देखील पुणेकरांसमोर खुल्या कराव्यात आणि ज्या 50/100 ठिकाणी धरणातून विसर्ग झाल्यावर पाणी शिरते त्याच्या सद्यस्थितीबाबत अवगत करावे”

