पुणे-वाढीव एफएसआय देऊन पुण्यातील कालवा उखडून देणार नाही ,कालव्याची जागा शहराची ऑक्सिजन झोन नलिका बनली पाहिजे या दृष्टीने या जागेवर पर्यावरण पूरकच कामे व्हावीत , या जागेचा किंवा या जागेवर वाढीव FSI देऊन हि जागा कॉंक्रीटच्या डायनोसॉर पासून वाच्विलीच पाहिजे अशी ठाम भूमिका घेत आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत,चाफेकरनगर नागरिक कृती समितीचे श्रीकांत भिसे, गणेश खेंगरे, शंकर थोरात व प्रशांत कांबळे, सुभाष करंडे, फॅबियन सॅमसन यांनी पत्रकार परिषद घेत पुण्याच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मुठा डावा कालवा गिळंकृत करण्याचा डाव काही बिल्डर महापालिकेच्या मदतीने राबवीत असल्याचा आरोप केला आहे.

ते म्हणाले,’ पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेला मुठा डावा कालवा (किलोमीटर 8 ते 27) म्हणजे 20 किलोमीटर लांबीचा कालवा हा पुणे शहरात वारजे ते गणेशखिंड रोड असा मध्यवर्ती भागातून जातो. यातील काही ठिकाणी या कॅनॉलमध्ये पाईप टाकून रस्ता बंदिस्त करण्यात आला आहे तर काही ठिकाणी हिरवाई जोग्गिंग ट्रॅक व तत्सम वॉकिंग, सायकल ट्रॅक बनवण्यात आलेले आहेत. वाहतूक समस्येमुळे काही ठिकाणी हा पथ एकेरी वाहतुकीसाठी तर काही ठिकाणी पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी वापरला जातो. काही भागावर वृक्षरोपण केले गेले आहे. मॉडेल कॉलनी भांडारकर रोड भागात या रस्त्यावर वृक्षांचे हिरवे आच्छादन तयार झालेले आहे.
परंतु आता पुणे महानगरपालिकेने काही बांधकाम व्यावसायिक यांच्या फायद्यासाठी अधिकचा एफएसआय मिळावा यासाठी, या कॅनॉलला थेट पोहोच/ अप्प्रोच रस्ता म्हणूनच संबोधले आहे. या शहर विकास आराखड्यात वॉटर बॉडी दर्शवण्यात आलेल्या कॅनॉल रोडला थेट १२ मीटर रुंदीचा पोहोच रस्ता संबोधून बेकायदेशीर रित्या वाढीव एफएसआय सहित बांधकाम नकाशे मान्य करण्यात आले आहेत. यासाठी बिल्डरला पाटबंधारे विभागाशी कॅनाल / कालव्याचा सेवापथ वापराचा एक वर्षाचा खंडित होणारा तात्पुरत्या स्वरूपाचा भाडेकरार करण्यास करण्यास सांगितले जात असून त्याद्वारे पाटबंधारे विभाग,मनपा बांधकाम विभाग आणि कॅनॉल शेजारील खाजगी जमीन मालक, बिल्डर हे संगनमताने बेकायदेशीर व्यवहार करीत आहेत. यासंदर्भातील अधिकृत बांधकाम नकाशे, भाडे करार आणि विकास आराखडे पत्रकार परिषदेत आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी दाखवले.

1995 साली पुणे शहरातून जाणाऱ्या कॅनॉल / कालव्याचा सेवारस्ता म्हणून खंडित स्वरूपात पुणे महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यामध्ये करार करण्यात आला होता. त्यानुसार दुचाकींसाठी दिवसा हा रस्ता पुणेकर नागरिकांसाठी खुला करण्यात आला. आता या 20 किलोमीटर रस्त्यावर काही ठिकाणी वृक्ष काही ठिकाणी जोग्गिंग , वॉकिंग, सायकल रस्ता अशा सुविधा करण्यात आल्या आहेत. परंतु भवितव्याचा विचार करता शहर विकास आराखड्यामध्ये मात्र हा पूर्ण कालवा वॉटर बॉडी म्हणूनच राखून ठेवण्यात आलेला आहे. आराखड्यात या जागी कोणताही रस्ता प्रस्तावित नाही.
या कॅनॉल रस्त्याच्या गैरफायद्याचे प्रकरण आम आदमी पार्टीने आज उघड केले. शिवाजीनगर मधील आयुक्त बंगल्यासमोरील हरेकृष्ण मंदिर रोड वरील जीवन प्रदीप को-ऑपरेटिव्ह सोसायटी ने पाटबंधारे विभाग सोबत एक वर्षाचा भाडेकरार केला आहे. पुणे महानगरपालिकेची या रस्त्याबाबत पाटबंधारे विभागाने यापूर्वीच करार केलेला असतानाही या नव्या कराराद्वारे या कॅनॉल रोडचा वापर करण्यास पाटबंधारे विभागाने बेकायदेशीर परवानगी दिली. या तात्पुरत्या स्वरूपातील भाडे कराराला पोहोच रस्ता समजून या सोसायटी च्या बिल्डरने वाढीव एफएसआय घेत नवे नकाशे मान्य करून घेतले आहेत. याच धर्तीवर कॅनॉल हाच रस्ता दाखवून त्याद्वारे वाढीव एफएसआय मिळवण्याचे षडयंत्र पुणे शहरातील मध्यवर्ती प्रभात रोड, भांडारकर रोड, मॉडेल कॉलनी या तब्बल वीस किलोमीटर लांबीच्या कॅनॉल रोडवर केले जाऊ शकते. यामुळे आम आदमी पार्टी तसेच चाफेकर नगर येथील स्थानिक रहिवाशी यांनी मिळून पुणे महानगरपालिका आयुक्त ,बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग यांची भेट घेतली. परंतु त्याकडे महानगरपालिकेने सहेतुक दुर्लक्ष केले. त्यामुळे आता यासंदर्भात आम आदमी पार्टी चे मुकुंद किर्दत तसेच चाफेकर नगर नागरिक कृती समितीचे श्रीकांत भिसे, गणेश खेंगरे, प्रभाकर तिवारी, सागर किंजालास्कर, गुलाब वाघ आदींनी सीपीसीच्या कलम 80 नुसार आयुक्त मनपा, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, बांधकाम विभाग पुणे व नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात महानगरपालिकेने सदरचे नकाशे रद्द करावेत व बांधकाम विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे, अन्यथा आम आदमी पार्टी व चाफेकरनगर वस्ती नागरिक आयुक्तांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.
शहरात असा २० किलोमीटर जमिनीचा पट्टा गणेशखिंड ते वारजे असा उपलब्ध आहे. शहर विकास आराखड्यामध्ये मात्र हा पूर्ण कालवा वॉटर बॉडी म्हणूनच राखून ठेवण्यात आलेला आहे. आराखड्यात या जागी कोणताही रस्ता प्रस्तावित नाही. असे असल्याने भविष्यात त्याचा अतिशय उत्तम वापर युरोपियन / जर्मनी च्या धर्तीवर जॉगिंग, व्यायाम , सायकल व पादचारीवापरासाठी, कलाकार कट्टा, शालेय विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी आदीसाठी वापरता येईल. शहराला हा ऑकसीजन झोन/ ब्रीधिंग झोन म्हणून वापरता येईल. मध्य शहरातील एफएसआय वाढवण्यासाठी याचा वापर होऊ नये अशी अपेक्षा आहे.

