पुणे-खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या धनकवडीतील घरात घुसण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शंकर सर्जेराव धुमाळ (वय 47, रा. पुणे) या इसमाला पुणे पोलिसांनी अटक केली असून, त्याने फक्त घरात घुसण्याचाच नव्हे, तर पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याचेही उघड झाले आहे.या प्रकारामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, तापकीर यांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून लक्ष वेधलं. त्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.या प्रकरणात मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 85(1), भारतीय दंड संहिता कलम 352, 351(2)(3) (धमकी व झटापट), 132, 333 (सरकारी कर्मचाऱ्यास दुखापत), तसेच पोलिस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम 1922 अंतर्गत कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुमाळने तीन वेळा तापकीर यांच्या धनकवडीतील निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ केली, धमकावलं आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी तापकीर यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला या व्यक्तीवर किरकोळ स्वरूपात कारवाई झाली होती. मात्र त्यानंतरही आरोपीने वारंवार गोंधळ घालत धमक्या देत राहणं सुरू ठेवलं.गंभीरता लक्षात घेता आमदार तापकीर यांनी थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली. त्यानंतर उपायुक्तांच्या आदेशानुसार सहकारनगर पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपीला अटक केली.
भीमराव तापकीर हे भाजपचे कार्यक्षम आमदार आणि मंत्रिपदाचे हक्काचे दावेदार असलेले ज्येष्ठ नेते मानले जातात. त्यांनी 2001 मध्ये पुणे महापालिकेपासून राजकारणाची सुरुवात केली, आणि सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2011 च्या पोटनिवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून विधानसभेत पदार्पण, त्यानंतर 2014, 2019 आणि नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या निवडणुकीत सलग विजय मिळवून आमदार झाले आहेत.

