मुंबई विमानतळावरून दुबईकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI909 फ्लाइटने प्रवाशांच्या सहनशक्तीची कसोटी पाहिली. जवळपास 300 प्रवाशांना तब्बल 5 तास बंद विमानात AC शिवाय उपाशीपोटी बसवून ठेवण्यात आलं. यामध्ये लहान मुलांचा आक्रोश, महिलांचा संताप आणि प्रवाशांची असहाय्यता दिसून आली.
28 मे रोजी सकाळी 8.25 वाजता उड्डाण होणारं हे विमान, अचानक तांत्रिक बिघाडाच्या कारणाने 9.30 पर्यंत पुढे ढकललं गेलं. त्यानंतर काहींना अमिराती एअरलाईन्सचा पर्याय देण्यात आला. मात्र 180 प्रवाशांना 12 वाजताच्या विमानात बसवून विमान धावपट्टीवर नेत पुन्हा तांत्रिक कारणाने थांबवण्यात आलं.
तासाभराचं म्हणत तब्बल पाच तास उशीर
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात एसी बंद होता, पिण्यास पाणी नव्हतं, खाण्याची व्यवस्था नव्हती. छोट्या बालकांना भूक लागून ते ओरडू लागले. आई-वडिलांना मुलांना शांत करणे कठीण झाले. एअर इंडियाचा स्टाफ मात्र अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
सकाळी 5 पासून विमानतळावर थांबलेलो, विमानात बसलो तर हाल सुरू. AC बंद, पाणी नाही, मुलं रडतायत, स्टाफ उत्तर देत नाही… आम्ही काय गुन्हा केला होता? – असा प्रश्न एका प्रवाशाने पत्रकारांपुढे उपस्थित केला. एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र या प्रकारामुळे सामान्य प्रवाशांचा संयम सुटला असून, सोशल मीडियावरही यावर संताप व्यक्त होत आहे. अनेक प्रवाशांनी एअर इंडियाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

