राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट (Siddhant Shirsat) यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. संबंधित महिलेने आरोप केला आहे की, सिद्धांत शिरसाट यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या प्रकरणात ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून, सिद्धांत शिरसाट यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, मला अतिशय शॉक बसला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, सगळे राजकारणी कुठल्या थराला जातायत. याप्रकरणी मुलीचे स्टेटमेंट आहे की, सिद्धांत शिरसाट यांनी खूप धमक्या दिल्यात. स्वतःच्या डोक्याला बंदूक लावून आत्महत्या करेन, ब्लेडने स्वतःला कापून घेईल, असा मानसिक छळ करून तिला लग्नाला लावले. त्यानंतर माझे वडील कॅबिनेट मंत्री होणार आहेत. त्यामुळे तुला घेऊन जाऊ शकत नाही, असे म्हटले. सोबतच तू आमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीस, अशी धमकी दिली. हे सगळे खूप गंभीर आणि शॉकिंगय. संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन हा विषय मांडावा, असे आवाहनही त्यांनी केले. शिरसाटांनी स्वतः पुढाकार घेतला नाही, तर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा आम्ही त्यांना कारवाई करायला भाग पाडू. मुलीवर दबाव कसा आणला, तिला नांदवायला संभाजीनगरला घेऊन जाऊ शकत नाही, या सगळ्या विषयावर शिंदे आणि शिरसाट या दोघांनी बोलावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारे गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात असेल किंवा लोकप्रतिनिधी अशा प्रकारे सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर लेकीबाळीवर हात टाकत असतील तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. भाजपने संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी जी तत्परता दाखवली होती. ती शिरसाट यांच्या राजीनाम्यासाठी दाखवली जाणार का? आपल्या बापाच्या सत्तेचा गैरफायदा घेत हे प्रकरण दाबण्याचा आणि त्या महिलेवर अन्याय करण्याची जी ताकद आहे, ती सत्तेतून आली आहे. त्यामुळे फडणवीस ही सत्ता काढून घेण्याची हिंमत दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे, असे अंधारे यांनी म्हटले आहे. मी पीडितेची भेट घेऊन हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. एका महिलेवर अन्याय होत असेल आणि तिने तशी तक्रार केली असेल, तर त्यावर रीतसर कारवाई होणे आवश्यक आहे. राजकीय दबावापोटी तक्रारीकडे दुर्लक्ष करून गुन्हा न दाखल करून घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणी थेट महिला आयोगावर टीका केली आहे. जलील म्हणाले की, दुर्दैव याचे वाटते की, एका मंत्राच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे. मग सगळे लोक गप्प का आहेत? राज्याचा महिला आयोग का गप्प आहे? आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आमची हात जोडून विनंती आहे की, ताई ती मुलगी मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा आणि तिला न्याय द्या.

