मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक व मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी पीडितेने सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस बजावत त्यांच्यावर मानसिक व शारीरिक छळासह हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.दरम्यान,या प्रकरणी सिद्धांत शिरसाट यांनी या नोटीशीची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगत आपले हात वर केले आहेत .
पीडित महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत शिरसाट यांनी चेंबूर येथील त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित महिलेशी लग्न केले. दोन वर्षे ते चांगले राहिले. पण नंतर तिसऱ्याच मुलीशी त्यांचे अफेअर सुरू झाले. यामुळे त्यांनी पीडितेकडे दुर्लक्ष करत तिचा मानसिक छळ सुरू केला. तिने कुठे तक्रार दाखल करू नये म्हणून सिद्धांत शिरसाटने स्वत:च्या डोक्याला बंदूक लावत तिला धमकावले.
वकील चंद्रकांत ठोंबरे म्हणाले की, सिद्धांत शिरसाट यांनी पीडितेला छत्रपती संभाजीनगरलाही येऊ दिले नाही. तू तिकडे आलीस तर तुझे तंगडे तोडू अशी धमकी त्यांनी तिला दिली. त्यामुळे आम्ही त्यांना यासंबंधी नोटीस पाठवून पीडितेला 7 दिवसांच्या आत नांदण्यास घेऊन जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी पीडितेला नांदण्यास नेले नाही तर आम्ही महिला अत्याचार प्रतिबंधक काद्यांतर्गत त्यांच्यावर 3 केस दाखल करणार आहोत.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. सदर महिलेने सिद्धांत यांना कायदेशीर नोटीस बजावून त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 2018 मध्ये सोशल मीडियावरून सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख झाली. काही दिवसांतच हे नाते चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचले. या संबंधानंतर सिद्धांतने आत्महत्येच्या धमक्या देत तिला भावनिक ब्लॅकमेल केले. त्याचबरोबर लग्नासाठी दबाव आणला.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सिद्धांतच्या सततच्या भावनिक आश्वासनांवर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी विवाह केला. मात्र या नात्याचा शेवटही वेदनादायक ठरला. महिलेला गर्भधारणाही झाली होती, पण सिद्धांतने जबरदस्तीने तिचा गर्भपात करवून घेतल्याचा उल्लेख तिने नोटीसीमध्ये केला आहे. संजय शिरसाट हे राज्याचे सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई न करता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

