इस्रो येथे राष्ट्रीय बक्षिस वितरण समारंभ : इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक
पुणे : विज्ञान आणि अध्यात्म याचे प्रगटीकरण करीत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) बेंगळुरू येथील मुख्यालयात इस्कॉन पुणे द्वारे दरवर्षी आयोजित केली जाणारी जगातील सर्वात मोठी मूल्य शिक्षण स्पर्धेचा राष्ट्रीय बक्षिस वितरण समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद इस्रोचे माजी अध्यक्ष आणि चांद्रयान-३ मोहिमेचे प्रमुख व्यक्ती डॉ. एस. सोमनाथ यांनी भूषवले. डॉ. सोमनाथ यांनी देशभरातील ६० राष्ट्रीय अव्वल दर्जाच्या विद्यार्थ्यांचा वैयक्तिकरित्या सत्कार केला, त्यांना मेडल, भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या तरुण यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना इस्कॉनच्या या उपक्रमातून शिकलेल्या शाश्वत नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचे पालन करण्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
दरवर्षी डिसेंबरमध्ये आयोजित केली जाणारी ही मूल्यशिक्षण स्पर्धा संपूर्ण भारतातील २० जिल्ह्यांतील १.५ लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते, ज्यांच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातात. जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना फेब्रुवारीमध्ये स्थानिक पातळीवर बक्षीस दिले जातात, तर राष्ट्रीय विजेते एप्रिल – मे मध्ये होणाऱ्या ग्रँड फिनालेसाठी बेंगलोरमध्ये एकत्रित होतात. गेल्या काही वर्षांत, १२ लाखांहून अधिक मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. ज्यामुळे हा जगातील सर्वात मोठा मूल्यशिक्षण उपक्रम बनला आहे.
डॉ. एस. सोमनाथ म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्ये रुजवण्याचा दूरदर्शी प्रयत्न इस्काॅन करत आहे. तंत्रज्ञान मानवी सुख सुविधा वाढवण्याचे काम करत असताना आत्मचिंतन आणि चारित्र्य मजबूत करण्यास देखील प्रेरित केले पाहिजे. भगवद्गीता आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यात इस्कॉनचे संस्थापक श्री़ प्रभुपाद यांचे योगदान असामान्य आहे असे गौरवोउद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमात डॉ. सोमनाथ यांच्या हस्ते त्यांच्या आगामी महाभारत पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले. या समारंभात फिनोलेक्स, मोटो व्होल्ट, अॅव्हॉन सायकल्स, फ्लेअर पेन्स, न्यूट्रिशियस चिक्की, बोरोसिल, ड्यूक टी-शर्ट्स आणि अँम्ब्रेन वॉचेस यासारख्या महत्त्वपूर्ण कॉर्पोरेट प्रायोजकांच्या प्रतिनिधींनीही हजेरी लावली.
शुभ विलास प्रभू यांनी आधुनिक काळात मूल्य-आधारित शिक्षणाची गरज, प्रभाव आणि परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. इस्रोचे वरिष्ठ अधिकारी हरे कृष्णन , गणेश पिल्लई यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त केले. राष्ट्रीय विजेते विद्यार्थी आणि इस्रो अध्यक्ष यांच्यातील व्यक्तिगत संवादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
पुणे इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष श्रीमान राधेश्याम प्रभू यांचे मार्गदर्शन मिळाले. पुणे इस्कॉन मंदिराचे वरिष्ठ प्रचारक श्रीमान वरदराज प्रभू या कार्यक्रमाचे समन्वयक आहेत.

