पुणे- वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे मराठा समाजाच्या नेत्यांनी मोठी चळवळ सुरु केली आहे . या प्रकरणाने खळबळ माजली आहे. यानिमित्ताने लग्नात ज्या अनिष्ट प्रथा सुरु झाल्या, त्या बंद करण्याबाबतची चर्चा आणि काही निर्णय सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या एका बैठकीत झाले आहे. आगामी काळात पुणे शहरापुरती एक कार्यकारिणी निर्माण करुन व्यासपीठ तयार करण्याचे बैठकीत ठरवले गेले आहे.
शांताई हॉटेल मध्ये झालेल्या बैठकीत शहरातील प्रमुख लोकांनी कोणत्या अनिष्ट प्रथा दूर करण्याचे ठरवले आहे. हुंडासारखे प्रकार दिसले आणि महिलेचा छळ झाला तर संबंधित कुटुंबासोबत रोटी-बेटी व्यवहार बंद केला जावा .ज्या घरात अशा पध्दतीने लग्न होतात व मुलींना त्रास होतो त्याठिकाणी लग्न न करण्याचे ठरवण्यात येणार आहे. वेळेत लग्न लावणे, मान्यवर सत्कार रद्द करणे, लग्नात मान्यवर हे नवरदेव किंवा इतर पाहुणे यांना सोन्याची चैन, अंगठी, वाहनाच्या चाव्या देणार नाही. मर्यादीत लोकात, कमी खर्चात आणि वेळेत लग्न समारंभ पुढील काळात पार पाडणे आदी गोष्टीवर भर दिला जाणार आहे.यावेळी आमदार चेतन तुपे,अंकुश काकडे,राजलक्ष्मी भोसले,दत्ता धनकवडे, अरविंद शिंदे,माजी आमदार सुनील टिंगरे, प्रशांत जगताप, श्रीकांत शिरोळे, दत्ता बहिरट, कमल व्यवहारे,संजय बालगुडे ,विकास पासलकर ,राजेंद्र कोंढरे शाम मानकर उपस्थित होते.
बैठकीत अनेक वक्त्यांनी मते व्यक्त केली. शहरातील अनेक मातब्बर घराणी आहे त्यांना सोबत घेऊन समाजातील ज्या अनिष्ट प्रथा आहे त्या दूर करणे प्रयत्न करण्यात येतील. पुणे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. पुणे शहराने नेतृत्व करुन मराठा समाजासोबत इतर समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी अनेक दिवस पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील.
समाजाच्या भितीपोटी लोक लग्न झालेल्या मुलींना पुन्हा माहेरी आणत नाही, परंतु आता समाज लग्न झालेल्या मुलींच्या पाठीशी राहील. मराठा समाजावर ज्याप्रकारे चिखलफेक केली जात आहे, ती चुकीची आहे. लग्नात जो बडेजावपणा केला जात आहे, तो बंद करण्यासाठी आज समाजाने पुढाकार घेतला आहे. राजेंद्र हगवणे कुटुंबात जे घडले त्याचे समर्थन कधी केले जाणार नाही. सुसंस्कृत समाजाला दिशा देण्याचे काम करुन चुकीच्या रुढी, परंपरा यांना छेद दिला जाईल. यापुढील काळात देखील वारंवार बैठका घेऊन नवीन आचारसंहिता तयार केली जाईल.

