पुणे -जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून साेमवारी दुपारी अडीच वाजता भामा आसखेड धरणाच्या परिसरात पाईट राैंधळवाडी येथे मासेमारी करणाऱ्या तरुणाच्या अंगावर वीज काेसळून ताे मयत झाल्याची घटना घडली आहे. संताेष गुलाब खांडवे (वय- २८) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ताे राैंधळवाडी ग्रामपंचायत हद्दीत माैजे वेताळे याठिकाणचा रहिवासी आहे.
या घटनेत संताेष खांडवे याचा माेबाईलसह अंगावरचे कपडे वीज पडल्याने जळाल्याचा प्रकार घडला आहे. खांडवे याच्या शरीराची उजवी एक बाजू डाेक्यापासून पायापर्यंत जळालेल्या अवस्थेत मिळून आली आहे. त्याच्या अंगावर वीज पडल्यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी तातडीने प्राथमिक आराेग्य केंद्र पाईट याठिकाणी तपासणीसाठी आणले परंतु त्याचा मृत्यु उपचारापूर्वीच झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. त्यामुळे त्याला पुढील कार्यवाहीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा तात्काळ पंचनामा पाईट मंडल अधिकारी एस.एस.सुतार, ग्राममहसुल अधिकारी एम.जी.क्षीरसागर, ग्रामपंचायत अधिकारी पाईट ए.एन.फुलपगर, जयसिंग दरेकर उपस्थित हाेते. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी तसेच पाईट याठिकाणी कमीत कमी पाच किलाेमीटर अंतरापर्यंत रेंज असणाऱ्या वीज प्रतिबंधक टाॅवर बसण्याची मागणी जयसिंग दरेकर यांनी केली आहे.

