मुंबई-मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दुपारच्या सुमारास मलबार हिल येथील तीनबत्ती परिसरात एक इमारतीचा आणि संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.या घटनेत कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.
मागील 24 तासांपासून मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सकाळपासून पाऊस झोडपत आहे. आज मलबार हिल परिसरातील तीनबत्ती रोडवरील एका जुन्या म्हाडाच्या इमारतीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते. यादरम्यान फाउंडेशनचा आणि संरक्षण भिंतीचा काही भाग आज पावसामुळे कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. भिंतींचा भाग रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक देखील संथ करण्यात आली आहे. तीनबत्तीच्या या रोडवरून मोठी वाहतूक होत असते. व्हीआयपी लोकांचा हा रहदारीचा मार्ग आहे.
दरम्यान, दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील हेरिटेज बाणगंगा तलावाच्या कंपाऊंड भिंतीचा काही भाग रविवारी संध्याकाळी पावसात कोसळला होता. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. महालक्ष्मी मंदिराजवळील ऐतिहासिक स्थळावर कंपाऊंड भिंतीचा 10-15 फूट भाग कोसळला होता.

