पुण्यास अगोदर रेड नंतर ऑरेंज अलर्ट
मुंबई/पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत असून, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत.
मुंबईत पुढील 24 तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला.
बारामतीत 25 घरांशी अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत.
इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.
फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.
सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे.
रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.
मुंबईत 24 तासात 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत.
मागील 24 तासांपासून मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सकाळपासून पाऊस झोडपत आहे. यामुळे शहरात विविध ठिकाणी 7-8 किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेषतः ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. काळ्याकुट्ट ढगांमुळे मुंबईतील दृश्यमानता खूपच कमी झाली आहे. त्याचा फटका हवाई सेवेला बसला आहे.
भूमिगत मेट्रोची दाणादाण – मुंबईतील पावसाचा मेट्रो-3 प्रकल्पाला फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होत आहे. परिणामी, रेल्वेने मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भुयारी मेट्रोकडे जाणारे गेटही बंद करण्यात आले आहे. मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 ही नुकतीच सुरू करण्यात आली होती. पण आता पहिल्याच पावसात तिला फटका बसला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे रविवारी सुमारे 35 वर्षांनंतर महाराष्ट्रात मान्सूनचे वेळेआधी आगमन झाले. राज्यात साधारण 5 जूनच्या आसपास मान्सून प्रवेश करतो. पण यावेळी तो 10 दिवसांपूर्वीच धडकला आहे. यापूर्वी 20 मे 1990 रोजी मान्सून वेळेपूर्वी पोहोचला होता.हवामान खात्याने आज दिनांक 26 मे रोजी पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील ३-४ तासांत रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.सततच्या पावसामुळे रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पाणीपातळी वाढली असून, आज (२६ मे) दुपारी १२.३० वाजता ती इशारा पातळीच्या वर आहे
खाली पहा जेजुरीच्या मंदिराच्या पायऱ्यावरून वाहणारे पाणी
मान्सून मुंबईत दाखल अन् मुंबईला रेड अलर्ट
मुंबईच्या प्रादेशिक हवामान खात्याने मान्सून मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, मराठवाड्याच्या उस्मानाबादपर्यंत मान्सून पोहोचला आहे. मुंबईत सकाळी 8.30 वाजेपर्यंत 135.5, तर सांताक्रूझमध्ये 33.5 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील हार्ट रिजनमध्येही हा अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन तुंबलं आणि मोडतोड झाली.
आजचा पाऊस / एकुण
यवत. 96•00 / 306.00
केडगाव.73•00/ 310.00
पाटस. 71•00/ 298.00
दौड. = 43•00/ 322•00
रावण गांव =42•00 / 236•00
बोरीबेल =104.00 / 233.00
भिगवण = 98•00 / 268•00
पळसदेव=20•00/ 207.00
शेटफळ=325•00/ 688.00
इदापूर =54•00/ 310.00
पावसाने अवघ्या महाराष्ट्रभर जोरदार हजेरी लावली आहे. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये देखील गेल्या 24 तासांत तब्बल 233 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी याच काळात शून्य मिलिमीटर पाऊस कोसळला होता. यावर्षीचा आज पर्यंत तब्बल 410 मिलिमीटर पाऊस कोसळलेला आहे. त्यापैकी निम्मा पाऊस गेल्या 24 तासांत कोसळला आहे.
नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा- मागील चार ते पाच दिवसापासून नीरा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे वीर धरणाच्या खालील मुक्त पाणलोट क्षेत्रातील येवामुळे सद्यस्थितीत नीरा नदी पात्रात अंदाजित 30000 Cusecs इतका विसर्ग वाहत आहे. तसेच नीरा नदी पात्रातील को.प. बंधाऱ्यांमध्ये आधीपासून पाणीसाठा आहे. नीरा नदी पात्रातील पुराच्या पाण्यास अडथळा होऊ नये म्हणून बंधाऱ्यांचे वरील बर्गे काढण्याचे काम या विभागाकडून हाती घेण्यात आलेले आहे. तथापि पावसाचा जोर वाढत गेल्यास नीरा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील येवामुळे नीरा नदीच्या पात्रातील बंधा-यांवरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. तरी नीरा नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.





