आसावरीच्या यशाचे केले कौतुक, पुनर्वसनासाठी ठोस पाठपुराव्याची ग्वाही
“या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा थांबणार नाही” – डॉ. नीलम गोऱ्हे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली जबाबदारी; शिवसैनिकांकडून तातडीने जगदाळे कुटुंबाला दिलासा
पुणे, दि. २५ मे २०२५ : पहलगाम येथे पीडित जगदाळे कुटुंबाची विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. या भेटीत त्यांनी आसावरी जगदाळे हिच्या नुकत्याच लागलेल्या निकालाबाबत तिचे अभिनंदन केले. आसावरीने कायदेविषयक डिप्लोमा परीक्षेत गुणवत्तेने यश मिळवले असून, ती सध्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या मॅनेजमेंट अभ्यासक्रमासोबतच लेबर लॉ या क्षेत्रातही शिक्षण पूर्ण करत आहे. तिच्या शैक्षणिक यशाच्या पार्श्वभूमीवर तिच्या कुटुंबाची अपेक्षा आहे की, पुणे शहरातच सरकारी क्षेत्रात तिला रोजगाराची संधी मिळावी, जेणेकरून ती आपल्या आई व कुटुंबासोबत राहू शकेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संपूर्ण जगदाळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शहर प्रमुख नाना भानगिरे आणि शिवसेना कार्यकर्त्यांना जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नाना भानगिरे, सुधीर जोशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज तातडीने कुटुंबाला भेट दिली. या भेटीत त्यांच्या कायदेशीर आणि पुनर्वसनासंदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. कुटुंबाने दिलेला अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असून, त्या सर्व बाबींचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
भेटीदरम्यान त्यांनी एक भावनिक क्षणही सांगितला की, आज आसावरीचा निकाल लागला तेव्हा तिचे वडील तिच्यासोबत जेवायला असायचे, परंतु या वेळी ते अनुपस्थित होते, ही भावना सर्वांना हेलावून गेली. हा जो घाला भारतावर झालेला आहे, त्याचे उत्तर दोषींना केंद्रसरकारने दिले तरी जोपर्यंत पाकिस्तानी वा ईतर दहशतवाद चालु राहिल तोपर्यंत न्यायासाठी लढाई चालूच राहील त्यात भारताय यश मिळावे , अशी ईश्वरचरणी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
या प्रकरणाचा न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा थांबणार नाही, असा संकल्पही यावेळी करण्यात आला.

