पुणे-
सायबर गुन्ह्यांमधील वाढती संख्या आणि प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता, पुण्यातील सध्याचे एकमेव सायबर पोलीस ठाणे हे अपुरे पडत असून, पाचही परिमंडळामध्ये प्रत्येकी एक सायबर ठाणे निर्माण करावे अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
पुण्यातून अमेरिकन नागरिकांना “डिजिटल अरेस्ट”च्या बनावट धमक्या देत गिफ्ट कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या खराडी येथील एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे.
सन 2022 मध्ये 10 हजार 692 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली, 2023 मध्ये ही संख्या 11 हजार 974 होती तर 2024 मध्ये तब्बल 12,954 गुन्ह्यांची नोंद झाली होती. याचाच अर्थ सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापैकी केवळ 6,204 (2022), 7,069 (2023) आणि 1,739 (2024) गुन्ह्यांचाच न्यायालयीन निकाल लागलेला असून उर्वरित प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याकडे रासने यांनी लक्ष वेधले.
त्यासाठी पुण्यातील पाच परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक अशी पाच सायबर पोलीस ठाणी स्थापन केल्यास सायबर गुन्ह्यांची जलद आणि तांत्रिक तपासणी शक्य होईल. तसेच अतिरिक्त पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, ई-ऑफिस प्रणालीद्वारे सायबर पोलीस ठाण्यांचे आधुनिकीकरण करावे, प्रशिक्षित मनुष्यबळाची भरती करावी अशा मागण्याही रासने यांनी आपल्या पत्रात केल्या आहेत.

