पुणे- येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाची धग अजून निवळलेली नसतानाच, पिंपरी चिंचवडमध्ये हुंडाबळीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 22 वर्षांच्या विवाहितेने लग्नाच्या अवघ्या पाचव्या महिन्यात सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा पती आणि नणंद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नाही, असा आरोप पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना उघडकीस आल्याने, राज्यभरात पुन्हा एकदा हुंडाबळीच्या घटनांबाबत तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी खरेदीसाठी माहेरहून 50 हजार रुपये न आणल्याने सासरच्या मंडळींनी मानसिक दबाव टाकल्याचा आरोप पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. पूजाचा विवाह गजानन निर्वळ याच्याशी काही महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, लग्नानंतर थोड्याच दिवसांत तिला सासरी त्रास दिला जाऊ लागला. माहेरच्यांनी दुचाकीसाठी पैसे न दिल्यामुळे तिचा मानसिक छळ सुरू केला. अखेर या जाचाला कंटाळून पूजाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यांच्याविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेला आता एक महिना उलटून गेला असतानाही संबंधित आरोपी अजूनही मोकाटच आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला, तरी कारवाईकडे लक्ष देत नसल्याचा आरोप पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. “ही आत्महत्या नव्हे, तर खून आहे,” असा दावा करत पूजाच्या कुटुंबियांनी पोलिसांवर सहकार्य न करण्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांना याबाबत विचारले असता या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तुझ्या बापाला गाडी द्यायला सांग अशी मागणी नवरा करत होता, तर तू पांढऱ्या पायाची आहेस, असे म्हणत सासू छळ करत होती. अखेर या जाचाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील लोहगाव भागात घडली आहे.पीडित महिलेचे लग्न २२ मे २०२२ रोजी अजय पवार याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही महिन्यातच तिला त्रास देण्यास सुरुवात झाली
सासरच्या त्रासाला कंटाळून 23 वर्षीय विवाहितेने झुरळ मारण्याचे औषध पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती अजय यांच्याशी 22 मे 2022 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या सहा महिन्यानंतर अजय पवार यांनी घरगुती कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर फिर्यादी यांची सासू कमल पवारने फिर्यादी यांना “तु माहेरावरुन काय आणले आहेस, तुझ्या आई बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही” असे म्हणत मानसिक त्रास दिला.
पती अजय पवार याने देखील फिर्यादीचा मानसिक छळ केला. मी तुझ्याशी टाइमपास केला, आता तू मेली तरी चालेल. मला पैशाची गरज आहे. मला चारचाकी गाडी घेऊन देण्यास सांग तुझ्या बापाला, अशी मागणी त्याने केली. यावर पीडित विवाहितेने नकार दिला. तेव्हा पतीने तिचा गळा दाबून मारहाण केली. तसेच दीर मनोज पवार याने देखील पीडित विवाहितेला शिवीगाळ केली.
21 मे रोजी पीडितेच्या सासूने हिणवण्यास सुरुवात केली. पहिल्या सुनेला घराबाहेर काढले तसेच तुलाही बाहेर काढेल, अशी धमकी दिली. तसेच तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजर चांगली नाही. तू घरात आल्यापासून शांतता नाही, असे म्हणत मानसिक छळ केला. अखेर हा सततचा त्रास सहन न झाल्याने पीडितेने झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आता तिची तब्येत ठीक असल्याचे समजते. विशेष म्हणजे या नंतर पीडितेने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

