पुणे-म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलाचे गुगल मॅप वर “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” असे नाव बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बाणेर पोलीस स्टेशन कडे धाव घेत संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.बालेवाडी म्हाळुंगे स्थित श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलाच्या संदर्भात गुगल लोकेशन मॅपवर काही समाज कंटकांनी जाणून बुजून श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल ऐवजी “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” असे नाव बदलले आहे. अशी माहिती बालवडकर यांनी दिली.
या प्रकारामुळे समस्त शिवप्रेमी, खेळाडू, ग्रामस्त व नागरिक अत्यंत संतप्त झाले असून अशा या समाज कंटकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. गुगल ‘मॅप ला जाऊन अशा प्रकारे लोकेशन एडीट केले आहे. असे सांगत त्यांनी काही पुरावेदेखील सादर केले आहेत.या खोडसाळपणामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार तंत्रज्ञानाचा चुकीचा उपयोग करून केला जात आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच, गुगल मॅपच्या एडीट पर्यायाचा वापर करून इंटरनेट वरील हॅकर्स इतरही अनेक असे गुन्हे करू शकतात तरी याला वेळीच आळा घालावा. असे बालवडकर यांनी म्हटले आहे.यासोबतच, गुन्हे हे शक्यतो Virtual Private Network वापरून केले जाते. तरी सदर प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घ्यावा. तरी सदर प्रकरणातील दोषींना तातडीने शोधुन अशा या समाज कंटकांवर तातडीने कारवाई करावी व संबंधित गुगल लोकेशन मॅपवरील नाव लवकरात लवकर बदलण्यात यावे. अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे.

