आधार संस्थेच्या संस्थापक डॉ. नंदा शिवगुंडे यांचे मत ; वंचित विकास संस्थेतर्फे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘अभया सन्मान’ देऊन गौरव
पुणे : एक महिला शिकली, तर ती संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते. ती सक्षम झाली, तर तिला आत्महत्येसारखा पर्याय निवडण्याची वेळ येत नाही. फक्त मुलींना शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांना स्वावलंबी देखील बनवले पाहिजे. यामुळे प्रत्येक स्त्री सक्षम बनेल, असे मत आधार संस्थेच्या संस्थापिका डॉ. नंदा शिवगुंडे यांनी व्यक्त केले.
वंचित विकास संस्थेतर्फे एकल महिलांचे संघटन करणे, आदिवासी निराधार महिलांचे सक्षमीकरण, तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना ‘अभया सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. पुणे श्रमिक पत्रकार भवनच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वुमनिया पुणे च्या संस्थापिका प्रीती क्षीरसागर, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ, तृप्ती फाटक आदी उपस्थित होत्या.
बीड मधील केज तालुक्यातील एकल महिलांचे संघटन करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, संविधानीक मूल्य समाजात रुजविणे हे काम करणाऱ्या अनिता कांबळे, नागपूर मधील पांढराबोडी, रामनगर येथील आदिवासी निराधार महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या बबीता धुर्वे, पुण्यात तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या कादंबरी शेख आणि बीडमध्ये अस्तित्त्वाची लढाई लढणारी कार्यकर्ती रत्नमाला गायकवाड यांना अभया सन्मान देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय संगीता भरत काळे आणि वैष्णवी प्रसाद काळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. ओल्या हळदीच्या अंगाने सीमेवर जाण्यासाठी हसतमुखाने निरोप देणाऱ्या भारतीय सैन्यदलातील प्रसाद काळे यांच्या पत्नी वैष्णवी प्रसाद काळे व त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार करणाऱ्या आई संगीता भरत काळे या दोघींचाही आदर्श समाजापुढे ठेवावा म्हणून सर्व भारतीयांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी ‘ग्राम परिवर्तन प्रबोधिनी’, मु. कटगुण, ता. खटाव, जि. सातारा या ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तके भेट देण्यात आली.
प्रीती क्षीरसागर म्हणाल्या, मी केवळ महिलांसाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून खूप काम केले आहे. परंतु आज प्रत्यक्ष महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील अनेक अडचणींना सामोरे जात सक्षमपणे उभे राहणाऱ्या प्रत्येकीचे कौतुक वाटते, असेही त्यांनी सांगितले.
सन्मानाला उत्तर देताना कादंबरी शेख म्हणाल्या, माणूस जन्माला एकटा येतो आणि एकटाच जातो; पण जीवनाच्या प्रवासात त्याला कुटुंबाची साथ लाभली, तर त्याचा सर्वांगीण विकास शक्य होतो. मात्र, एकल पालकांच्या मनातील एकटेपणाची भावना तेव्हाच संपते, जेव्हा अशा संस्था त्यांच्या पाठीशी कुटुंबाप्रमाणे उभ्या राहतात. आज बहुतांशी संवाद फक्त आभासी माध्यमांतूनच होताना दिसतो. अशा परिस्थितीत या कार्यक्रमासारख्या उपक्रमांतून प्रत्यक्ष भेटीगाठी, संवाद आणि माणुसकीची जाणीव निर्माण होते. माणसाने माणसाकडे माणुसकीच्या नजरेने पाहिलं पाहिजे.
मीना कुर्लेकर म्हणाल्या, स्त्री जर स्वतंत्र विचार करायला शिकली, निर्भीड बनली, तर शिक्षण असून किंवा नसो ती खंबीर बनेल. स्वतः चे निर्णय स्वतः घ्यायला शिकली तसेच स्वतः विचार करायला शिकली, तर स्त्री आत्महत्या होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. तृप्ती फाटक यांनी सूत्रसंचालन केले.

