पुणे-
रामदरा डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेली तीन अल्पवयीन भावंडे माघारी येताना रस्ता चुकून डोंगरावर अडकले, पावसाने जोर धरला होता. पोलीस फोनद्वारे मुलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र फोन स्वीच ऑफ लागत होता. या परिस्थितीत पोलिसांनी डोक्यावर पावसाची रिमझिम झेलत, रात्रीच्या अंधारात टोर्चच्या सहाय्याने झाडी झुडपातून वाट करीत डोंगरावर निघाले होते. मुलांना आवाज देत डोंगर चढत होते. डोंगरावर दोन तास शोध घेतल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुले डोंगरावर मिळून आले.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत डोंगरावर हा प्रसंग काल घडला ,शुक्रवारी (ता.23) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास याबाबतची माहिती समजताच लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने भर पावसात मुलांचा शोध घेऊन दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलांची सुखरूप सुटका केली .
अनुष्का जीवन पवार (वय-16), नैतिक जीवन पवार (वय-14), व आर्यन गणेश गवानदे (वय-16, रा. गुजरात) अशी रस्ता चुकलेल्या मुलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का पवार व नैतिक पवार हे दोघे नात्याने सख्ये बहिण भाऊ आहेत. तर आर्थन गवानदे हा त्यांचा मावसभाऊ आहे. तिन्ही मुले ही सुट्ट्यांमध्ये त्याचे लोणी काळभोर येथील नातेवाईक नेहा भानुदास थोरात (वय-24, रा. जॉयनेस्ट सोसायटी, लोणी काळभोर) व उरुळी कांचन येथील सुनिल दत्तात्रय कांचन (वय – ३१) यांच्याकडे आले होते.
दरम्यान, अनुष्का, नैतिक व आर्यन यांचा रामदरा येथे ट्रेकिंगसाठी जाण्याचा प्लान ठरला. त्यानुषंगाने तिघेही रामदरा डोंगरावर ट्रेकिंगसाठी शुक्रवारी (ता.23) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते. डोंगरावर दोन तीन तास झाल्यानंतर अचानक पाऊस सुरु झाला. त्यातच अंधार पडायला लागला होता. डोंगरावरून घाईघाईने उतरताना त्यांचा रस्ता चुकला आणि तिन्ही मुले डोंगरावर अडकले.त्यानंतर मुलांनी रामदरा डोंगरावर रस्ता चुकून अडकल्याची माहिती पुणे शहर पोलिसांच्या कंट्रोल रूमला शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस अंमलदार मयुर बोरातके, वैभव खोत, प्रदीप गाडे व सोनवणे यांचे एक पथक तयार करून घटनास्थळी पाठवून दिले.पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पावसाने जोर धरला होता. पोलीस फोनद्वारे मुलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र फोन स्वीच ऑफ लागत होता. या परिस्थितीत पोलिसांनी डोक्यावर पावसाची रिमझिम झेलत, रात्रीच्या अंधारात टोर्चच्या सहाय्याने झाडी झुडपातून वाट करीत डोंगरावर निघाले होते. मुलांना आवाज देत डोंगर चढत होते. डोंगरावर दोन तास शोध घेतल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुले डोंगरावर मिळून आले.
लोणी काळभोर पोलिसांनी तिन्ही मुलांना सुखरूप लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलाविले. तिन्ही मुलांना सुखरूप पालकांच्याकडे स्वाधीन केले.

