पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड जीवनगौरव पुरस्कार वितरण
डॉ. भूषण पटवर्धन व बडोदा संस्थानचे जितेंद्रसिंह गायकवाड जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत
पुणे, दि.२४ मे: ” क्षमा, शौर्य, धर्म आणि नितीच्या तत्वांचा समावेश असलेला हा पुरस्कार एक ऊर्जावान आहे. आपल्या क्षेत्रात अमूल्य योगदान देऊन समाजाला प्रेरणा देण्याचे कार्य करणार्या नारी शक्तीचा हा विशेष सन्मान आहे. मूल्य, मातृत्वप्रेम आणि वारकरी संप्रदायाचे हे प्रतिक आहे. दूरदृष्टी ठेवून विश्वधर्मी डॉ. कराड यांनी नारी शक्तीच्या गौरवासाठी सुरू केलेल्या या पुरस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांनी आधुनिक काळात नव्याने सशक्तीकरणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे.” असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्या वतीने विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या बाराव्या पुण्यस्मरण स्मृतिदिनाचे औचित्य साधून पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
बडोदा संस्थानचे जितेंद्रसिंह गायकवाड हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
या प्रसंगी ज्ञानविज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या बडोदा येथील बडोदा संस्थानच्या महाराणी सौ. आशाराजे संग्रामसिंहराजे गायकवाड, ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती भारती ठाकूर, राजस्थान येथील ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ पीस अँड वेलबिईंगच्या राजयोगिनी डॉ. बिन्नी सरीन आणि बद्रिनाथ धाम येथील माणा गावाच्या शिक्षिका व समाजसेविका श्रीमती दमयंती जितवान आणि आळंदी येथील श्रीमती रमाबाई किसन महाराज साखरे यांच्या वतिने (श्रीमती कुलकर्णी ) या पंचकन्यांना पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, स्मृतिपदक व रोख रु. १,२५,०००/- (सव्वा लक्ष रुपये )असे पुरस्काराचे स्वरुप होते.
या प्रसंगी बडोदा संस्थानाचे जितेंद्रसिंह गायकवाड आणि डॉ. भूषण पटवर्धन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याच प्रमाणे विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचाही विशेष सत्कार ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने डॉ. बिन्नी सरीन यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास ह.भ.प. तुळशीराम कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम कराड, डॉ. हनुमंत कराड, प्रा. डॉ. सुचित्रा नागरे, प्रा. स्वाती चाटे, पूनम कराड नागरगोजे, डॉ. विश्वजीत नागरगोजे, कमल राजेखाँ पटेल, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर, राजेश कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले,” ज्या देशात महिलांचा सन्मान होतो त्याच देशाची संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ ठरते. रामेश्वर गाव आदर्श होण्यामागे मातृशक्ती आहे तेव्हा मातृप्रधान संस्कृती टिकली पाहिजे. त्यागमुर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या पंचकन्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे ”
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “विश्वधर्मी मानवता तीर्थ म्हणून रामेश्वर गावची देशभर ओळख निर्माण झाली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मुर्तीमंत प्रतिक त्यागमूर्ती अक्का आहेत. ईश्वर ही व्यक्ती नाही तर शक्ती आहे. रामेश्वर येथे मानव एकतेचे मोठे प्रतिक निर्माण केले गेले आहे. अक्कांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारातील सर्वच पंचकन्यांचे कार्य महान आहे.”
जितेंद्रसिंह गायकवाड म्हणाले,”कराड सरांचे जे व्हिजन आहे त्यानुसार मला सयाजी गायकवाड यांनी १९०६ मध्ये सुरू केलेल्या पुरस्कारांची आठवण होते. मी याच मातीचा आहे. मला उस्मानाबाद, तुळजापूर सहित ७३ गावांची इनामी मिळाली होती. आज जीवन गौरव पुरस्कारने सन्मानीत केल्यामुळे ही अतिशय आनंदीत आहे.”
पुरस्कार प्राप्त पंचकन्यांचे अभिनंदन केल्यानंतर बडोदा संस्थानच्या महाराणी आशाराजे संग्रामसिंहराजे गायकवाड म्हणाल्या,”अतिशय कणखर व संत प्रवृत्तीच्या त्यागमूर्ती अक्का यांच्या नावाने मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल आभार. गायकवाड घराणे आणि नेपाळ मधील राजघराण्यात माझे व्यक्तीमत्व प्रगल्भ होत गेले. त्यामुळेच माझा हा सत्कार झाला.”
भारती ठाकूर म्हणाल्या,”विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, या नुसार अशी अनुभूती झाली की येथे पांडुरंगांच्या भक्त मंडळांचे सम्मेलन भरले आहे. विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर रुई येथील राम रहिम सेतू ही अतिशय सुंदर संकल्पना आहे. या भूमितच विश्वधर्म संकल्पना रुजलेली आहे. कराड परिवारांचे कार्य संपूर्ण जगभर पसरो.”
राजयोगिनी डॉ. बिन्नी सरीन म्हणाल्या,” डॉ. कराड यांच्या दृढ संकल्पाने गावात बदल घडला आहे. त्यांनी शांती, एकता आणि बंंधुत्वासाठी जीवन समर्पित केले आहे. त्यांच्यात सतत नवीन आशा, चेतना आणि ऊर्जेचा अनुभव होत असतो. कणखर व्यक्तिमत्वाच्या अक्का यांच्या नावाचा पुरस्कार स्विकारून मी स्वतःला खूप भाग्यशाली समझते.”
अक्कांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मी माणा गावात कार्य करण्याचे आश्वासन दमयंती जितवान यांनी दिले.
या वेळी डॉ. एस.एन.पठाण यांनी येथे सर्व संमतीने पारीत करण्यात आलेल्या ठरावे वाचन केले. ‘हा ठराव हिंदुत्व याचा अर्थ भारतीय एकात्मता आणी याच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांच्या लोकांमध्ये एक दुसर्यांमध्ये बंधुत्व राहिल, तसेच भारत देशात आणि संपूर्ण जगात विश्वशांतीसाठी कार्य करण्याचा आहे.’
प्रा.स्वाती कराड चाटे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की, हा पुरस्कार एका कणखर दूरदृष्टी नेतृत्व असणार्या अक्कांच्यामुळे आहे. त्यांचे व्यक्तिमत्व हे अध्यात्मिक होते. त्यांनी कराड घराण्याची जडण घडण केली आहे.
डॉ. मिलींद पात्रे यांनी सुत्रसंचलन केले. डॉ. सुचित्रा नागरे यांनी आभार मानले.

