पुणे: गुजरात , राजस्थान येथून पुण्यात कापड वाहतुकीच्या नावाखाली प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सिगारेटची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत हा प्रकार उघडकीस आणला आहे.
याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुटख्यासह टेम्पो, कंटेनर असा सुमारे एक कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाकडून ऊरुळी देवाची येथील मंतरवाडी फाट्यावर करण्यात आली.
याप्रकरणी अजिनाथ बबन धुमाळ (वय ३१, चालक, रा. केशवनगर, मांजरी बुद्रुक), मदनसिंग चित्तो राम (वय ३८, चालक, रा. जम्मू काश्मीर), राधेशाम बाबुलाल वर्मा (रा. मंतरवाडी), मिथुन नवले (रा. गणेश पेठ), दौलतराम जांगिड (रा. मंतरवाडी) आणि निखिल अगरवाल (महाराष्ट्र फ्राईट कॅरिअर्स प्रा. लि. व चंद्राई वेअर हाऊस या गोडाऊनचे मालक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार पृथ्वीराज किसन पांडुळे ( गुन्हे शाखा 5) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंतरवाडी-कात्रज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कपड्याचे गोडाऊन्स आहेत. कपड्याचे व्यापारी गुजरात, तसेच राजस्थानमधून कापड आणून मंतरवाडी-कात्रज रस्त्यावरील गोडाऊन्समध्ये ठेवतात. मात्र कापड विक्रीच्या नावाखाली प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सिगारेटची तस्करी होत आहे. अशी माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (१९ मे) साडेसहा वाजण्याच्या सुमारास मंतरवाडी-कात्रज रस्त्यावर उरुळी देवाची येथील एका हॉटेलच्या मागे छापा टाकून प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याची वाहतूक करणारा चालक धुमाळ याला टेम्पोसह अटक केली.
दरम्यान, तपासात कापडाच्या बॉक्समध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला असल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच अधिक तपासात या टेम्पोचा मालक आरोपी नवले असल्याचे समोर आले. चालकाकडे याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंतरवाडी-कात्रज रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ छापा टाकत गुन्हे शाखेच्या पथकाने एक कंटेनर चालकासह ताब्यात घेतला आहे. मदनसिंग असं चालकाचं नाव आहे.
जप्त केलेल्या कंटेनरमधून प्रतिबंध केलेला पानमसाला, तंबाखू आणि सिगारेटची अवैधरीत्या बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे समोर आले. आरोपी निखिल अगरवालने तपासात सांगितल्यानुसार, चालक मदनसिंग याने दिल्लीवरुन प्रतिबंधित गुटखा आणि सिगारेटची कंटेनरमधून वाहतूक केल्याचे समोर आले.
दरम्यान, पोलिसांनी चंद्राई वेअर हाऊस नावाच्या गोडाऊनवर छापा टाकून ‘आरसीबी फॉर एक्सपोर्ट’ नावाचा प्रतिबंधित गुटखा गुन्हे शाखेने जप्त केला आहे.
गुन्हे शाखा 5 च्या कारवाईत पोलिसांनी 2 चालक, वाहनांचे मालक तसेच गोडाऊनचा व्यवस्थापक आणि मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाई करून पोलिसांनी 1 कोटी १३ लाख ७२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

