पुणे–
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना सांगलीत घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 2 विद्यार्थ्यांसह त्यांच्या एका मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. विनय विश्वेष पाटील (22, महिपती निवास, अंतरोळीकरनगर, भाग 1 सोलापूर शहर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (20, एफ 605, सरगम, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) व तन्मय सुकुमार पेडणेकर (21, 303 कासाली व्हिला, अभयनगर, सांगली) अशी अटक केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या तिघांनाही पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.कोर्टाने या तिघांचीही 27 मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गत 18 मे रोजी ही घटना घडली. त्या दिवशी पीडित विद्यार्थिनी व आरोपी चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर आरोपी तिला आपल्या फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे आरोपी विद्यार्थ्यांनीला थंड पेयाच्या माध्यमातून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत तिघांनीही कथितपणे तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. काहीवेळाने पीडिता शुद्धीत आली. तिने झाल्या प्रकाराचा आरोपींना जाब विचारला. त्यानंतर आरोपींनी तिला या प्रकाराची जाहीर वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडित विद्यार्थिनी मूळची कर्नाटकच्या बेळगावची आहे. घटनेनंतर ती परत आपल्या खोलीवर आली. तिने आपल्या आई-वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही तासांतच तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींचे वय 20 ते 22 वर्षांचे आहे. यापैकी 2 विद्यार्थी एमबीबीएसचे विद्यार्थी असून, ते पीडित विद्यार्थिनीसोबतच शिकतात. सध्या आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या सामूहिक बलात्कारासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

