स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन : समाजातील विविध घटकातील मुलांची विनामूल्य मुंज
पुणे : स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सकल हिंदू समाजातील ५५ पेक्षा अधिक बटूंच्या सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध घटकातील तसेच अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थांमधील मुला-मुलींची मुंज यावेळी होणार आहे. बुधवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ९ वाजता कर्वे रस्त्यावरील अश्वमेध मंगल कार्यालयात हा सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बटूसाठी वस्त्रे, पूजा साहित्य, भोजन व अन्य आवश्यक सामग्री ट्रस्टच्या वतीने विनामूल्य पुरवण्यात येणार आहे. बदलत्या काळात शिक्षण आणि जीवनशैलीत अनेक बदल झाले असले, तरी भारतीय हिंदू संस्कृतीतील मूलभूत संस्कारांची गरज अजूनही तितकीच महत्त्वाची आहे. त्यापैकीच एक म्हणजे व्रतबंध संस्कार ज्ञानार्जनाच्या प्रवासाची सुरुवात करणारा एक पवित्र टप्पा आहे. या संस्काराचे समाजव्यापी महत्त्व ओळखून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत आपल्या कार्यकाळात सर्व हिंदू समाजासाठी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याची संकल्पना मांडली होती. सावरकरांनी मालवणला तथाकथित १५० अस्पृश्यांच्या मुंजी लावल्या होत्या आणि त्यांना स्वतः जानवं घातली होती. त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट मागील चार वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. एकूण १५ हून अधिक समाजातील मुले आणि मुलींनी स्वेच्छेने या संस्कारासाठी नाव नोंदणी केली आहे.
व्रतबंधाचा कार्यक्रम संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने साग्रसंगीत करण्यात येणार आहे. सोहळ्याची सुरुवात गणेश पूजनाने होईल. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने चौलकर्म, मातृभोजन, व्रतबंधन हे विधी पार पडणार आहेत. यानंतर भिक्षावळ मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे.

