पुणे : नवीन घेतलेला फ्लॅट पाहण्यासाठी बाल मैत्रिणीने बोलवल्याने तो गेला. परंतु या मैत्रिणीने पती आणि इतरांच्या सहाय्याने त्याला मारहाण करुन बाथरुममध्ये डांबुन ठेवले. खंडणी उकळण्यासाठी त्याच्या मोबाईलवरुन मेसेज केला. कोंढवा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन चार तासात या तरुणाची सुटका करुन चौघांना गजाआड केले.
प्रवीण जगन्नाथ लोणकर (वय ३९, रा. कोंढवा खुर्द) अशी सुटका केलेल्या तरुणाचे नाव आहे. सोनल ऊर्फ सोनी कापरे ऊर्फ कटके (वय ३५, रा. सनश्री सनटेक सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द), अतुल दिनकर रायकर (वय ३८), रॉबीन ऊर्फ रवी मंडल (वय २४, रा. कोंढवा खुर्द) आणि सुरेश ऊर्फ कुरेश कुमारस्वामी हान (वय ३१, रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील प्रवीण लोणकर यांना त्यांची बालपणीची मैत्रीण सोनल ऊर्फ सोनी रायकर हिने मंंगळवारी सायंकाळी तिचा एनआयबीएम रोडवरील फ्लॅट पाहण्यासाठी व चहासाठी बोलावले़ लोणकर घरी जाताच त्यांच्या डोळयात मिरची पुड टाकून जखमी केले. त्यावेळी तिचा पती अतुल रायकर व इतर साथीदार हे फ्लॅटच्या बाहेर दबा धरुन बसले होते. त्यांच्या मदतीने सोनी हिने प्रवीण लोणकर यांना मारहाण करुन त्यांच्या तोंडात बोहा कोंबला. त्याचे हातपाय दोरीने बांधुन त्यांना बाथरुमध्ये डांबुन ठेवले. त्यांच्याकडून एटीएम कार्ड व मोबाईल काढून घेतला. त्यांच्या मोबाईलवरुन त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर मेसेज केला की, ‘‘घरातील दागिने व पैसे काढून ठेव. मी एकाला आपल्या घरी ते घेऊन येण्यासाठी पाठवत आहे’’ हा मेसेज पाहून त्यांच्या पत्नीला शंका आली. त्यांनी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. परंतु, व्हिडिओ कॉल आला नाही. काहीतरी गडबड असल्याची शंका त्यांना आली. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. यावेळी रात्र गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांना ही माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख यांना कळविले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ दखल घेऊन लोणकर यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
प्रवीण यांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून सहायक पोलिस निरीक्षक मोहसीन पठाण, सुकेशिनी जाधव, राकेश जाधव यांच्यासह तपास पथकाचे अंमलदार लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला यांनी त्यांचा शोध घेतला. त्यानुसार एनआयबीएम रोडवरील सनश्री सनटेक सोसायटीतील एका फ्लॅट मधून डांबून ठेवलेल्या प्रवीण लोणकर यांची सुटका केली. आरोपींविरोधात खंडणी, अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मनोज पाटील , पोलीस उप-आयुक्त परि.०५ डॉ. राजकुमार शिंदे सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, सहा. पोलीस निरीक्षक मोहसिण पठाण, सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, सहा. पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, व पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला यांनी केली आहे.

