Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मराठी नाईटिंगेल:मीना घोडविंदे

Date:

परिचारिका म्हटले की, आपल्या डोळ्यापुढे लगेच एखादे रुग्णालय आणि रुग्णाजवळ त्याला प्रेमाने औषध ,इंजेक्शन देणारी, सलाईन लावणारी पांढऱ्या शुभ्र गणवेशातील एका प्रेमळ स्त्रीची मूर्ती उभी राहते.अशाच एक लोकप्रिय, रुग्णांची अतिशय मनोभावे सेवा केलेल्या परिचारिका
सौ मीना घोडविंदे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी

मीनाताई अवघ्या दहा वर्षांच्या असताना त्यांच्या आईला देवाज्ञा झाली. त्यामुळे वडिलांनी;रामचंद्र वनगे
त्यांना जाणीवपूर्वक सुशिक्षित, सुसंस्कारी, सेवाभावी घडवले.१९५० च्या दशकात वडिलांचे ठाण्यामध्ये सुप्रसिद्ध कापड दुकान,अन टेलरिंग जेन्टस क्लोथ शॉप होते. मीनाताईना त्यांना दुकानात मदत करावी लागत असे. घरकाम, शाळा याबरोबरच मीनाताईंनी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन अनेक बक्षिसे मिळवली.त्या अकरावी बोर्डाची परीक्षा पास झाल्या आणि त्यांनी स्वतःतील सेवाभाव ओळखून ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील नर्सिंग कॉलेजला प्रवेश घेतला. तेथेही त्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत.
पुढे तिथूनच त्यांची वर्कर्स टीचर्स ट्रेनिंग साठी निवड झाली.त्या कुर्ला बोर्ड येथे प्रशिक्षणास जात असत.तेथे निरनिराळ्या संस्थातून ४० जणी प्रशिक्षणासाठी येत असत.

मीनाताईंचा नर्सिंगच्या चार वर्षांच्या प्रशिक्षणात त्या चारही वर्षे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.पुढे,बरीच वर्षे त्यान्च्या उत्तरपत्रिका शिकाऊ परिचारिकांना वाचण्यासाठी ठेवल्या जात असत.शिवाय या प्रशिक्षणात त्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत राहिल्या.
प्रत्येक स्पर्धेत त्यांचे बक्षीस ठरलेलेच असायचे.रांगोळी स्पर्धा, नृत्य, नाट्य, गायन, हस्ताक्षर ई. स्पर्धेत त्या अग्रणी असत.

नर्सिंग चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स म्हणून हॉस्पिटल प्रशासनानेच कायम स्वरुपी आदेश देऊन मीना ताईंना रुजू करून घेतले.सर्वात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या प्रसूती कक्षामध्यें सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती मातेला धीर देत, तणावमुक्त करत आश्वस्थ करीत असत.अत्यंत संवेदनशिलतेने, अगदी शेवटच्या क्षणाला प्रसूती प्रक्रिया पूर्ण होताना, नवजात शिशुला कौशल्याने हाताळणे आणि इतर सर्व कामे त्या शास्त्रोक्त पद्धतीने करत असत. नवशिशूला स्वच्छ करत त्या मातेच्या जवळ ठेवत, अन स्तनपानाचे तंत्र मातेला शिकवत असत. त्यांच्या या सर्व कौशल्यपूर्ण कामाचे निरीक्षण केवळ शिकावू परिचारिकाच नव्हे तर शिकावू डॉक्टर्ससुद्धा करीत असत. कमालीची सहनशीलता, सहजता, नीटनीटकेपणा, स्वच्छता या मीनाताईंच्या गुणांचे सर्व कौतुक करीत असत.
प्रसूती कक्षातच त्यांना सातत्याने १० वर्षे सेवा करता आली.या दरम्यान त्यांनी जवळपास १० हजार गरीब महिलांच्या कौशल्याने प्रसूत्या
केल्या.

विवाहानंतर मीनाताईंच्या
३ पाळ्यांच्या नोकरीमुळे सासऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे त्या ठाण्यातच राहिल्या. पती कला शिक्षक असल्याने शाळेत चित्रकला, संगीत कला शिकवीत असत. शिवाय मुलांना ते खाजगीरित्याही शिकवत असत. तसेच मराठी भक्तीसंगीत व सुगम संगीताचे कार्यक्रम स्वतंत्ररित्या सादर करत असत .

मीनाताईंच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ३ वर्षांनी
दुसरा मुलगा झाला.

इतर स्त्रियांच्या बाळंतपणासाठी सदैव तत्पर असलेल्या मीनाताईंनी स्वतःच्या बाळाकडेही पूर्ण लक्ष दिले.म्हणूनच त्यांनी त्यांची प्रसूती रजा संपल्यावर शिल्लक होती ती पगारी रजा , तीही संपल्यावर बिन पगारी रजाही घेतली .पण आपल्या मुलांना स्वतःच्या नजरेखाली वाढवले .मुलांना जेव्हा स्वतः ची अंघोळ स्वतः करणे ,कपडे घालणे , प्रातर्विधी करणे ही कामे जमू लागली, तेव्हाच त्या मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरीस जाऊ लागल्या. ड्युटीवर जाताना मुले पाळणाघरात ठेवायची व घरी येताना घेऊन यायची हा त्यांचा नित्यक्रमच झाला. त्यात त्यांची ठाणे जिल्ह्यातली शिबिरातील कामाची वेळ असली किंवा त्यांच्या पतीस रात्रीच्या गाण्याच्या कार्यक्रमास जायची वेळ आली तर मुले पाळणाघरातच झोपी जायची. त्यामुळे त्यांची खूपच तारेवरची कसरत व्हायची. तेव्हा घरी फोनची सोयही नव्हती. त्यामुळे हे पतिपत्नी एका वहीत एकमेकांसाठी निरोप लिहून ठेवत असत.त्यात परत त्यांच्याकडे गॅसही नव्हता. त्यामुळे सर्व स्वयंपाक त्यांना स्टोव्ह वरच करावा लागत असे. कामाव्यतिरिक्तचा सर्व वेळ हे दोघेही मुलांसाठीच देत असत.३ पाळ्यातील परिचारिकेची नोकरी सांभाळत मुलांना घडविणे ही फार तारेवरची कसरत होती. पण मीनाताईं सातत्याने मुलांचे संस्कारवर्ग, खेळ , अभ्यास यात त्यांच्या सोबत स्वतःही सतत गुंतून राहायच्या. त्यामुळे मुले सरळमार्गी राहून कायम प्रथम
क्रमांक मिळवित राहिली. पुढे दोघांचेही शिक्षण पूर्ण झाल्यावर ते त्यांच्या गुणवत्तेवर नोकरीस लागले.

आजच्या अती महत्वाकांक्षी आईवडिलांनी लक्षात घ्यावी अशी गोष्ट म्हणजे, मीनाताईंनी स्वतःची कुठलीही मते मुलांवर न लादता त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला नेहमी वाव दिला. त्यामुळे दोन्ही मुलांना ,त्यांच्या मनाप्रमाणे स्वतःचे जीवन घडविता आले. या सर्व कष्टांचे फळ म्हणजे मुले तर चांगली घडलीच पण मीनाताईना डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या “आई महोत्सवात आदर्श आई” चा पुरस्कार प्रथम क्रमांकाने मिळाला अन जणू त्यांच्या जीवनाचे अन आईपणाचे सार्थकच झाले.आज त्या दोन गोंडस नातवंडाच्या आजी आहेत.त्यांच्या घरात गोकुळ नांदत आहे .या आनंदासोबत त्या व त्यांचे पती स्वतःचे छंद आवडीने जोपासत आहेत.

मीनाताईंच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन आरोग्य खात्याने त्यांचे नाव प्रथम क्रमांकाने राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठविले होते.या बरोबरच त्यांच्या सेवाभावी सेवेबद्दल त्यांचा शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक संस्था, ई. मधून अनेकदा गौरव करण्यात आला आहे.
पूर्ण सेवाभावी वृत्तीने ४१ वर्षे सेवा बजावून त्या नियत वयोमानाप्रमाणे ५८ व्या वर्षी निवृत्त झाल्या .

नोकरीतून सन्मानाने निवृत्त झाल्यावर आरामदायी जीवन न जगता मीनाताईंनी स्वतःला सामाजिक आणि साहित्यिक सेवेत मनस्वीपणे झोकून दिले आहे.अनेक गरजूंना त्या मदत करीत असतात.मदत करण्याची सहज प्रवृत्ती अन मनमिळावू स्वभाव यामुळे त्या खूप लोकप्रिय आहेत. स्वतःतील कलागुणांना विकसित करत जीवन जगण्याची किमया साधत त्या आनंदयात्री ठरल्या आहेत.

समाजात जनजागृती करण्यासाठी मीनाताई महिलांचे स्वातंत्र्य, हक्क, कर्तव्य, विद्यार्थ्यांवर संस्कार मूल्ये व शिक्षणाचे महत्व रुजविणे यासाठी सातत्याने लेखन करीत असतात. विविध काव्य स्पर्धेत, निबंध स्पर्धेत त्या सहभागी होतात आणि पुरस्कारही मिळवितात.

मीनाताईंच्या हाताखाली
४८ वर्षांपूर्वी प्रशिक्षणार्थी परिचारिका म्हणून राहिलेल्या आणि नंतर त्यांच्या जीवलग मैत्रीण बनलेल्या सौ चारुशीला गायकवाड मीनाताईंविषयी बोलताना म्हणतात,
“मीनाताईंचे कौशल्यपूर्ण काम बघत बघत आम्ही परिचारिकेचे काम आत्मसात करीत गेलो. नर्सिंगच्या सेवेसोबतच आपल्यातील कला गुणांना वाव देणे, विविध सामाजिक साहित्यिक उपक्रमात सहभाग घेणे ,हे त्यांचे व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण पहात आम्हीही नकळत घडत गेलो.”

अशा या अतिशय निष्ठेने परिचारिकेची सेवा बजाविलेल्या, निवृत्ती पश्चात सामाजिक,साहित्यिक सेवेत मनस्वीपणे काम करीत असलेल्या मराठी नाईटेंगल सौ मीनाताई वनगे घोडविंदे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.


लेखन:देवेंद्र भुजबळ
-9869484800

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...