वैष्णवीची आत्महत्या ( की हत्या ) बाळ पळविणे, बाळाला अज्ञाताच्या हाती ताब्यात देणे, मयुरी चा छळ करणारे ह्या सर्वांना संघटित गुन्हेगारी ची कलमे लावून मोका लावावा – संदीप खर्डेकर
पुणे–वैष्णवी हगवणेच्या शरीरावरील जखमा बघता ही हत्या का आत्महत्या असा संशय निर्माण होत असून या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा. तसेच मोठी सून मयुरी हिची तक्रार असताना देखील कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेच्या तक्रारीवर योग्य कारवाई न झाल्याने स्थानिक पोलिसांबाबत जनतेच्या मनात संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा अन्य यंत्रणेकडे सोपवावा. सासरच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या सर्व भगिनींना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर आरोपी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालणे ही शिक्षा सर्वोत्तम असेल. त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील नागरिकांनी, गावकऱ्यांनी, नातेवाईकांनी अशी क्रूर कृत्य करणाऱ्यांवर बहिष्काराचे अस्त्र वापरावे. तसेच यापुढे हुंडाबळीच्या प्रकरणात मुलीच्या सासरच्यांना “मकोका” लावण्याची तरतूद केल्यास जरब बसेल व असे प्रकार घडणार नाहीत. किंबहुना असे गैरप्रकार करणारे दहा वेळा विचार करतील, असेही संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे.
हुंड्यापायी विवाहितेचा अशाप्रकारे अमानुष छळ करणे चुकीची बाब आहे. त्यामुळे हगवणे कुटुंबातील सर्व नराधमांना कठोरतम शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

