पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत केलेल्या सर्वेक्षणात साडेनऊशे पेक्षा अधिक अनाधिकृत होर्डिंग असल्याचे समोर आले आहे. त्यावर कारवाई सुरू असून या कारवाईला विरोध / अडथळा निर्माण करणाऱ्याविरुद्ध थेट गुन्हे नोंदवणार असल्याची भूमिका पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतली आहे. महानगर आयुक्त यांनी गुरुवारी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेत, पीएमआरडीए हद्दीतील सर्व अनाधिकृत होर्डिंग काढण्याचे निर्देश दिले.
पीएमआयडीएने केलेला सर्वेक्षणात ९६७ अनाधिकृत होर्डिंग आढळून आले आहे. त्यातील जवळपास ९० होर्डिंग अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या माध्यमातून काढण्यात आले आहे. रहदारीस अडथळा आणणाऱ्या तसेच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा अनाधिकृत होर्डिंगवर सोमवारपासून (दि.२६) धडक कारवाईचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी दिले आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक पालखी मार्गावरून जात असतात. या मार्गावरील अनाधिकृत होर्डिंग तातडीने काढावेत. यासह उर्वरित होर्डिंगसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून ते दोन महिन्यात कसे काढले जातील, त्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश यावेळी डॉ. म्हसे यांनी दिले. पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून पीएमआरडीए हद्दीतील नालेसफाईला प्राधान्य देत नदी – नाल्याचा प्रवाह मार्गात असलेले राडारोडा दूर करावा. जेणेकरून त्या हद्दीतील नागरिकांना पुराचा धोका निर्माण होणार नाही.
यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, दक्षता अधिकारी तथा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, सह महानगर नियोजनकार श्वेता पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, रवींद्र रांजणे यांच्यासह अनधिकृत होल्डिंग काढणाऱ्या संबंधित एजन्सीचे पदाधिकारी उपस्थित होते.
हानी झाल्यास गुन्हा नोंदवणार
ज्या ठिकाणी अनाधिकृत होडींमुळे कुठली मनुष्यहानी किंवा इतर काही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित जागामालक आणि जाहिरात एजन्सीला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत सणसवाडी आणि भुकूम या ठिकाणी दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

