पुणे: लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक (ता. २२) आमदार बापूसाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून हे रुग्णालय पूर्ण होऊनही सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
सदर बैठकीमध्ये रुग्णालयाच्या अद्याप पूर्ण न झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. उर्वरित बांधकाम, पाणीपुरवठा लाईन, ड्रेनेज सिस्टिम व विद्युत जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा प्रलंबित आहे. या बाबतीत संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करून काम पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार पठारे यांनी दिल्या.
आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयाची प्रतीक्षा नागरिक करत आहेत. रुग्णालयाची इमारत उभी आहे, पण आरोग्यसेवा सुरू नाही, हे दुर्दैवी आहे. मी या विषयासंबंधी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आवाज उठवला होता. आता नागरिकांना प्रतीक्षेत ठेवणे योग्य नाही. लोहगावसह इतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय ससून रुग्णालयावरचा भार कमी होणार असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होईल.”
या बैठकीस डॉ. राधाकृष्ण पवार (उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ), डॉ. एम. पल्ली (जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे), श्रीमती भंडारे (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग, अजय पाटील (उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग), घाटकर (शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पठारे यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, की रुग्णालय पूर्ण कार्यक्षमतेने सुरू झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

