महिला आयोगाकडून दुर्लक्ष झाले असेल तर कारवाई करू
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यात कसपटे कुटुंबाने जे काही सहन केले आहे तसेच अजून ज्या कोणत्या बाबी तक्रारीत नमूद करायच्या राहिल्या असतील त्या बाबींचा समावेश करत या केसला अजून कसे मजबूत करता येईल ते बघता येईल. परंतु त्या आधी दोन आरोपी जे फरार आहेत त्यांना तातडीने पोलिसांनी अटक करावी.
पुढे बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही केस स्ट्रॉंग झाली पाहिजे. त्यासाठी आणखी काही विटनेस असतील किंवा जे इतर लोक असतील की ज्यांना असा अनुभव आला असेल त्यांनी त्यांच्या बाबी समाविष्ट करायला पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा कशी करता येईल या दृष्टीने शासनाच्या आणि पोलिसांकडून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन तटकरे यांनी दिले आहे.
हगवणे यांच्या मोठ्या सुनेने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. परंतु काही कारवाई केली गेली नाही. यावर अदिती तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मोठ्या सुनेने जर महिला आयोगाकडे तक्रार केली असेल आणि आयोगाकडून दुर्लक्ष झाले असेल तर त्या संदर्भात सुद्धा योग्य ती कारवाई केली जाईल. कारण कदाचित तेव्हा 6 महिन्यांपूर्वी दक्षता घेतली असती तर एक जिने तक्रार केली आहे तिलाही न्याय मिळाला असता आणि तिचेही अनुभव समोर आले असते. वैष्णवीचे अनुभव आणि मोठ्या सुनेचे अनुभव जवळपास सारखेच आहेत. परंतु मोठ्या सुनेला नवऱ्याची साथ असल्यामुळे सुदैवाने ती सुखरूप आहे. परंतु तक्रार दाखल करूनही दखल घेतली नसेल तर निश्चितच कारवाई केली जाईल.

