पुणे-वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात सुशिक्षित कुटुंबात देखील हुंडाबळीचा प्रकार घडल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र हगवणे व कुटुंबीय यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान वैष्णवीचे 9 महिन्यांचे बाळ कुठे आहे असा सवाल उपस्थित झाला होता.
वैष्णवी हगवणे यांचे 9 महिन्यांचे बाळ पुणे येथील कर्वेनगर येथे राहणारे नीलेश चव्हाण यांच्याकडे होते. वारंवार बाळाची मागणी केली असता नीलेश चव्हाण हे बंदुकीला हात लाऊन इथून चालते व्हा, असा दम भरायचे. परंतु आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी पुढाकार घेऊन बाळाचा ताबा मिळवला आहे. आता हे बाळ वैष्णवीच्या घरच्यांकडे म्हणजे कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
आरोपी राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या भावाने माहिती दिल्यानंतर कसपटे कुटुंब वैषणवीच्या बाळाला घ्यायला नीलेश चव्हाण यांच्या घरी गेले. परंतु नीलेश चव्हाणने बाळाला न देता कसपटे कुटुंबीयांना हुसकावून लावले होते. नीलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांकचा मित्र असल्याचे बोलले जात आहे. परंतु हगवणे यांच्या मोठ्या सून मयूरी हगवणे यांनी नीलेश चव्हाण हा शशांकची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचे सांगितले आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी माहिती देताना सांगितलं की, माझ्या भावाला एका अज्ञात व्यक्तीने ते बाळ आणून दिले. बाळाच्या रूपाने आम्ही वैष्णवीला पाहतो आहोत. वैष्णवी म्हणून आम्ही पुढे त्या बाळाचा संभाळ करणार आहोत अशी माहिती अनिल कसपटे यांनी दिली आहे. मला कोणाचाही फोन आला नाही, भावाला फोन आला होता.बाळ कुठे होते ते माहिती नाही, असेही ते म्हणाले. वैष्णवीचे काका मोहन कसपटे ज्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला त्यांनी माहिती देताना सांगितले की, मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तुम्ही बाणेर हायवेला या माझ्याकडे बाळ आहे. आम्ही त्यांना म्हटले आम्ही पिंरगुटला चाललो आहोत. ते म्हणाले आम्ही बाणेर हायवेजवळ आहे, तिथे या बाळ माझ्या ताब्यात आहे. तिथे गेल्यानंतर बाळ त्यांनी आमच्या ताब्यात दिले आणि ते तिथून निघून गेले. ते कोण होते त्याची कोणतीही माहिती नाही. दोन दिवसांपासून बाळाचा शोध सुरू होता, अशी माहिती मोहन कसपटे यांनी दिली आहे. तर आमचे बाळ आम्हाला मिळाले आहे, त्यामुळे आम्हाला आंनद आहे, असेही ते पुढे म्हणाले आहेत.
वैष्णवी मृत्यू प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल – मुख्यमंत्रीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल. ऑडिओ क्लिप तसेच इतर सर्वच गोष्टी तपासून वैष्णवीला न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. वैष्णवी मृत्यू प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवारांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांशी फोनवरून चर्चा केली आहे. मी तुमच्या पाठीशी आहे, चिंता करू नका. तसेच आरोपींना सोडणार नाही, असे आश्वासन देखील अजित पवारांनी दिले आहेत. लग्नाच्या वेळी मला कल्पना दिली असती तर मी लग्नच होऊ दिले नसते. मात्र, आता वैष्णवीला न्याय मिळवून देणार. मी आज बारामतीमध्ये आहे पण उद्या किंवा परवा पुण्याला आल्यानंतर मी तुम्हाला भेटने. मी मुलीच्याच बाजूने आहे, पहिल्या दिवशीपासून मी पोलिसांना याबाबत आदेश दिले आहेत. मी तुमच्याच पाठीशी आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेत वैष्णवीला न्याय मिळवून देणार, असेही अजित पवारांनी वैष्णवीच्या वडिलांना सांगितले आहे.
वैष्णवीच्या 8 महिन्यांच्या बाळाचा ताबा हा कायद्याने हगवणे कुटुंबाकडे किंवा कसपटे कुटुंबाकडे असायला हवा. परंतु आता हगवणे कुटुंबातील सदस्य अटकेत आहेत तसेच काही फरार आहेत. त्यामुळे आता बाळाचा ताबा हा वैष्णवीच्या घरी अर्थात कसपटे कुटुंबाकडे असायला हवा.
मुलाच्या लग्नात व्याह्यांकडून ५१ ताेळे साेने, सात किलाे चांदीची ताटे, भांडी, फाॅर्च्युनर गाडी घेतली. नंतर अधिक महिन्यात साेन्याची अंगठी आणि दीड लाखाचा महागडा माेबाइलही घेतला. यानंतरही जमीन खरेदीसाठी माहेरहून २ कोटी रुपये आण म्हणत सुनेचा छळ केला. छळामुळे तिने आत्महत्या केली, अशी ठाण्यात नोंद झाली. पण शवविच्छेदनात गळा दाबल्याची पुष्टी झाली. वैष्णवी शशांक हगवणे असे मृत विवाहितेचे नाव आहे, तर या घटनेतील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा पुणे-मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे, त्याचा मुलगा शशांक हगवणे व इतर तिघे आहेत. पाेलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, नणंद करिश्मा हगवणे व सासू लता हगवणेला अटक केली. सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे पसार आहेत.
शशांक-वैष्णवीचा विवाह प्रसिद्ध सनीज वर्ल्ड येथे दाेन वर्षांपूर्वी झाला होता. अनिल कस्पटे यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी लग्नात ५१ ताेळे साेने, सात किलाे चांदीची ताटे, भांडी, फाॅर्च्युनर गाडी, अधिक महिन्यात साेन्याची अंगठी, दीड लाखाचा माेबाइल दिला हाेता, तर दरवेळी मुलगी सासरी आल्यावर एक लाख ते ५० हजार रुपये देत राहिले. परंतु घाेटावडे परिसरात जमीन खरेदीसाठी माहेरहून दाेन काेटी रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी तिचा छळ केला. शेवटी १६ मे राेजी राहत्या घरी तिने गळफास घेतला.उर्वरित. पान ६
राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल : बुधवारी या प्रकरणाची राष्ट्रीय महिला-आयाेगानेही दखल घेतली आहे. आयाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत पाेलिस महासंचालकांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी फरार सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
वैष्णवीचे शवविच्छेदन पुण्यातील ससूनमध्ये केले. यात डाॅक्टरांना तिच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा मिळून आल्या, तर तिचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट केले. शरीरावर काही ठिकाणी रक्त गोठल्याचे डाग दिसल्याने व्हिसेरा व इतर नमुने प्रयाेगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहे. त्यामुळे वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली नसून तिचा खून झाला असा आरोप वडील अनिल कस्पटे यांनी केला.

