पुणे शहरासह जिल्हा आणि राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने धुव्वा केला. दुपारी चारनंतर पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासाभरानंतर ओसरलेल्या पावसाने रात्री आठनंतर पुन्हा जोर धरला.हा पाऊस एवढा जोरदार होता की, शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. कुठे वीज पडली, कुठे झाडे कोसळली तर कुठे होर्डिंग कोसळलं. अनेक ठिकाणी महावितरणची पंचायत केली अन् पुणेकरांची पावसाने बत्ती गुल केली. महापालिकेचं दरवर्षी प्रमाणे पितळ उघडे केले.
पुण्यातील सिंहगड रोड वरती राजाराम पुलापासून ते वडगाव पर्यंत झालेल्या नवीन उड्डाणपूलावर वाहतूक कोंडी झाली आहे. तास-दीड तासापासून वाहतूक कोंडीमध्ये पुणेकर अडकले आहेत.शहरातील इतर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झालं आहे. वानवडी कोंढवा भागात फुटपाथसह रोडवर पाणीच पाणी झालं आहे. गाड्या बंद पडल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली.शहरातील प्रत्येक पेठेत पाणी साचलं असून लक्ष्मी रस्त्याकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याला तलावाचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
मुसळधार पावसामुळे कात्रज भागात दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली आहे. कात्रज भागातील माऊली नगर, तसेच कोंढवा परिसरात मुसळधार पावसामुळे दुकानात आणि घरात पाणी शिरले होते.त्यामुळे जागोजागी पाणी साचले आणि रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले.
कात्रज आणि सिंहगड रस्त्यावर वीजेचा मोठा आवाज झाला. हा आवाज झाला तेव्हा माणिक बाग येथील अतिथी हॉटेलच्या वाहन तळाजवळ असलेल्या प्रतीक्षा भागाच्या पत्र्यावर वीज पडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
..येरवडा, कोरेगाव पार्क, धानोरी, टिंगरेनगर, एरंडवणा, देवाची ऊरुळी, बावधन, मुकुंदनगर, काळेपटल, काळेबोराटे नगर, हडपसर आणि फातिमानगर या भागांमध्ये झाडे कोसळल्याच्या १५ घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात नोंदवण्यात आल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नाही.
धनकवडीतील तीन हत्ती चौक आणि इतर काही भागांत संरक्षक भिंती कोसळल्या आहेत. काही परिसरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शिवाजीनगर, सदाशिव पेठ, सहकार नगर, धनकवडी, कात्रज, कोंढवा, खडकवासला, नांदेड सिटी, शिवणे, हडपसर, वाघोली आणि वडगाव शेरी या भागांत विशेषतः अधिक पावसाची नोंद झाली आहे.

