मुंबई-कल्याण पूर्व मधील मंगलराघो नगर परिसरात आज दुपारी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली. सप्तशृंगी नावाच्या चार मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला आणि थेट तळमजल्यावर आदळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व मधील मंगलराघो नगर परिसरात ही घटना घडली आहे. या भागात असलेल्या सप्तशृंगी नावाची चार मजली इमारतीत आहे. ही इमारत 19 वर्षे जुनी आहे. या इमारतीमध्ये एकूण 25 कुटुंब राहत होते. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचे काम सुरू होते. त्यावेळी आज दुपारच्या सुमारास या इमारतीतील स्लॅब अचानक कोसळला आणि थेट तळमजल्यावर आदळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. सुमारे तीन-चार बचाव कार्य चालले. या आठ जणांपैकी 6 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झालेत. जखमींवर पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांची नावे-नमस्वी श्रीकांत शेलार (वय 2), प्रमिला कालचरण साहू (56), सुनिता निलांचल साहू (38), सुशीला नारायण गुजर (78), व्यंकट भीमा चव्हाण (42), सुजाता मनोज वाडी (38)
जखमींची नावे-विनायक मनोज पाधी (4), शर्विल श्रीकांत शेलार (4), निखील चंद्रशेखर खरात (26), अरूणा वीर नारायण.
दरम्यान, सप्तशृंगी इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर फरशी बसवण्याचे आणि कोबा करण्याचे काम सुरू होते. जितेंद्र गुप्ता आणि व्यंकट चव्हाण हे कोबा करण्याचे काम करत होते. दुपारपर्यंत काम केल्यानंतर जितेंद्र गुप्ता हा जेवण्यासाठी बाहेर गेला. तर व्यंकट चव्हाण हा त्याच ठिकाणी जेवला आणि झोपला. जितेंद्र गुप्ता जेवण करून परत आला, तेव्हा त्याला इमारत कोसळल्याचे दिसल्याने त्याला मोठा धक्का बसला. कारण इमारत कोसळल्यानंतर झालेल्या ढिगाऱ्याखाली अडकून त्याचा मित्र व्यंकट चव्हाणचा मृत्यू झाला होता.

