पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची मागील वर्षी भरदिवसा हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. शहर आणि परिसरात मोठं वर्चस्व असणाऱ्या मोहोळच्या हत्येने गुन्हेगारी विश्वही हादरले होते. तसंच या हत्येचा बदला घेण्यासाठी मोहोळ टोळी सक्रिय झाली होती. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचणाऱ्या ओंकार सचिन मोरे वय २३ वर्ष रा. मुठा कॉलनी पुणे याला अटक केली आहे. मोरे याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे असून या प्रकरणात यापूर्वी शरद मालपोटे आणि संदेश कडू यांना अटक करण्यात आली .
याबाबतची सविस्तर हकीकत अशी की, शरद मोहोळ याची ५ जानेवारी २०२४ रोजी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत १३ आरोपींना अटक केली होती, ज्यामध्ये दोन वकिलांचाही समावेश होता. या प्रकरणात मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर, धनंजय मटकर, सतीश शेंडगे, नितीन खैरे, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर, विठ्ठल गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान आणि आदित्य गोळे यांचा समावेश होता.
या हत्येच्या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत १६ आरोपींवर कारवाई केली होती. या आरोपींमध्ये गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांचाही समावेश होता. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्येचा मुख्य सूत्रधार मानला जातो. मारणे याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी तीन राज्यांमध्ये शोध मोहीम राबवली होती. गणेश मारणे हा तुळजापूर, कर्नाटक, केरळ आणि ओडिशा येथे लपून बसला होता. अखेर पुणे पोलिसांनी नाशिकजवळ मोशी टोलनाक्याजवळ पाठलाग करून त्याला अटक केली होती.
दरम्यान, शरद मोहोळ हत्येच्या प्रकरणात आता ओंकार मोरेची अटक झाल्याने पोलिसांच्या तपासाला अधिक बळ मिळाले आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अतिरीक्त कार्यभार मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोउपनि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओमकार कुंभार, हनुमंत काबंळे, अमोल सरडे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण व नागेश राख यांनी केली आहे.

