NCP ने धनंजय मुंडेंची पोकळी भरून काढली-
मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादीने ऐनवेळी त्यांचे मंत्रिपद कापले होते. यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. पण आता त्यांना मंत्रिमंडळात घेऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर केली आहे. पण मुळात राष्ट्रवादीने भुजबळांना मंत्रिपद देऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे दूर गेलेला ओबीसी समाज पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा 5 डिसेंबर 2024 रोजी शपथविधी झाला. त्यावेळी छगन भुजबळ यांना सहजपणे मंत्रिमंडळात स्थान मिळेल असा दावा केला जात होता. पण ऐनवेळी राष्ट्रवादीने त्यांचा पत्ता कापला. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भुजबळ हे राज्यातील बडे ओबीसी नेते आहेत. ओबीसी समुदायात त्यांचा एक्का चालतो. पण राष्ट्रवादीने त्यांनाच मंत्रिमंडळाबाहेर ठेवल्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली. या प्रकरणी त्यांनी थेट अजित पवारांवर निशाणाही साधला. एवढेच नाही तर त्यांनी शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधत वेगळी वाट निवडण्याचे संकेतही दिले.
छगन भुजबळांनी आपल्यावर लोकसभा निवडणुकीवेळीही अन्याय झाल्याचा आरोप करून अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अडचणीत सापडले. या प्रकरणात त्यांचे मंत्रिपदही गेले. यामु्ळे ओबीसी समुदायाचा एक मोठा नेते मंत्रिमंडळातून बाहेर पडला. तेव्हाच मुंडे यांच्या जागी भुजबळांना संधी दिली जाईल असा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. त्यानुसार, छगन भुजबळांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आता त्यांना धनंजय मुंडे यांचेच अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील निवासस्थानी 8 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक पार पडली. या भेटीनंतर छगन भुजबळ व देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीनंतर फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बोलणे झाले. त्यानंतर भुजबळांचे मंत्रिपद निश्चित करण्यात आले. ओबीसी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आल्यामुळे ओबीसी समुदायात नाराजी पसरली होती. त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जबर फटका बसण्याची भीती होती. त्यामुळे ओबीसींची नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडताच मंत्रालयात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्रालयातील धनंजय मुंडे यांचा 204 क्रमांकाचे दालन जवळपास 2 महिन्यांनंतर उघडण्यात आले आहे. तिथे युद्ध पातळीवर साफसफाईचे काम सुरू आहे. त्यामुळे भुजबळांना हेच दालन मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भुजबळांना मुंडेंचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयही मिळण्याची शक्यता आहे. भुजबळांनी मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी नेटाने पार पाडण्याची तयारी दर्शवली आहे. मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मंत्रिमंडळात संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत.

