पुणे-पुणे शहरातील हडपसर भागात मगरपट्टा येथे चार बीएचके फ्लॅट मध्ये रहाणाऱ्या साॅफ्टवेअर कंपनीच्या मालकाच्या घरी चाेरट्यांनी डल्ला मारत २३ लाख ४३ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने व राेख रक्कम चाेरी करुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे कुटुंबीय घरातच असताना चाेरट्याने खिडकीवाटे हळूच घरात शिरुन ही चाेरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याप्रकरणी पार्थ मलकन गाैंडा (वय – ४४) यांनी अज्ञात आराेपी विराेधात पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पार्थ गाैंडा हे संगणक अभियंता असून त्यांची एक साॅफ्टवेअर आयटी कंपनी आहे. १७ मे राेजी रात्री ते १८ मे राेजी दुपार दरम्यान त्यांचे घरात कुटुंबीय घरातच होते. त्यावेळी अज्ञात चाेरट्याने खिडकीच्या वाटे घरात प्रवेश केला. त्याने बेडरुममधील कपाटात ठेवण्यात आलेली गाेदरेजची छाेटी लाॅकर ताेडली. त्यात ठेवण्यात आलेले २३ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने व राेख रक्कम घेऊन ताे पसार झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत पाेलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
हडपसर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक संजय माेगले याविषयी बोलताना म्हणाले, घटनेच्या दिवशी तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय घरात झाेपले होते. त्यांच्या पहिल्या मजल्यावरील घरात आराेपी हा पार्किंगमध्ये पार्क करण्यात आलेल्या गाडीच्या टपावरुन गॅलरीत शिरला व तेथून त्याने स्लायडिंग खिडकी उघडून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणात आराेपी घरातून मुद्देमाल घेऊन जातानाचा प्रकार साेसायटी मधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याआधारे आराेपीची ओळख पटवण्यात येत आहे. सदर फ्लॅट जवळील सुरक्षारक्षक याच्याकडे देखील याअनुषंगाने तपास करण्यात येत आहे. संशयित आराेपीचा माग काढण्यासाठी पाेलिस पथके कार्यरत झाली आहेत. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस गेंड करत आहेत.

