मुंबई-‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सत्ताधारी भाजपने देशभर तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. पण आता या विजयोत्सवावरून विविध नेते केंद्र सरकारला प्रश्न करू लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनीही या प्रकरणी ‘पहलगाम हल्ल्याला जबाबदार अतिरेकी कुठे आहेत?’ असा जळजळीत प्रश्न उपस्थित करत केंद्रावर निशाणा साधला आहे.
गेल्या 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह 26 पर्यटक मारले गेले होते. अतिरेक्यांनी या सर्वांना त्यांचा धर्म विचारून मारल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाक विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाक स्थित अतिरेकी अड्ड्यांवर हल्ला चढवण्यात आला. यावेळी दोन्ही देशांत भीषण धुमश्चक्री झाली. त्यात भारताने नेहमीसारखा आपला वरचष्मा राखला होता. पण त्यानंतर अचानक दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली. यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले. अनेकांनी या प्रकरणी केंद्राच्या निर्णयावर टीका केली. या पार्श्वभूमीवर भाजपने देशभरात तिरंगा यात्रेचे आयोजन करून ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी या विजयोत्सावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पहलगाम हल्ल्याचे अतिरेकी अजून सापडले नसल्याकडे बोट दाखवले आहे. आंबेडकर सोमवारी एका पोस्टमध्ये थेट पंतप्रधानांना उद्देशून म्हणाले की, मोदी, पहलगाम अतिरेकी हल्ल्याला जबाबदार अतिरेकी कुठे आहेत? जवळपास एक महिना झाला. तुम्ही कोणत्या गोष्टीचा उत्सव साजरा करत आहात? या हल्ल्यात ठार झालेल्या पीडितांच्या पत्नींना अद्याप न्याय मिळाला नाही.

