रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळील जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट नदीच्या 100 ते 150 फूट खोल पात्रात कोसळली. या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने कार नदीबाहेर काढण्यात आली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा वरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. पोलिसांनी कारचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढले. कार पूर्णपणे नष्ट झाली होती.
सोमवारी सकाळी 5.15 वाजता रेकॉर्ड झालेल्या एका व्हिडिओमध्ये हा संपूर्ण प्रकार दिसून येतो. या व्हिडिओमध्ये क्रेनने कार बाहेर काढताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी झालेली स्पष्ट दिसते. घटनास्थळी शोककळा पसरली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून देवरुखकडे जाणारी ही कार जगबुडी नदीच्या पुलावर आली असताना अचानक पुलाची कठडा तोडून नदीत कोसळली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. तपासानंतरच खरी माहिती समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ही कार विवेक श्रीराम मोरे यांच्या मालकीची असून, कारमधून खालील प्रवासी प्रवास करत होते: मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर, मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत, विवेक श्रीराम मोरे, परमेश पराडकर या प्रवाशांपैकी मेघा पराडकर, सौरभ पराडकर, मिताली मोरे, निहार मोरे व श्रेयस सावंत यांचा मृत्यू झाला आहे. तर कारचा चालक विवेक मोरे व परमेश पराडकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने नदीत कोसळलेली कार वर खेचण्यात आली. कारची अवस्था पाहून अपघाताच्या भीषणतेचा अंदाज येत होता. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी दरवाजे फोडावे लागले.

