परभणीत शिवसेना महिला आघाडीचा मेळावा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने उत्साहात संपन्न
परभणी : “सशक्त महिला म्हणजे सक्षम समाजाचे बळ,” असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परभणीतील शिवसेना महिला आघाडीच्या मेळाव्यात मांडले. महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे, असे आवाहन करत त्यांनी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठीच्या विविध योजनांचा आढावा घेतला.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने परभणीत आयोजित महिला मेळावा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या संयोजनातून उत्साहात पार पडला. विविध विभागातील महिला पदाधिकारी, लाडक्या बहिणी, शिवसेना कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना सामाजिक, आर्थिक व राजकीय पातळीवर सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. “आपल्यातील क्षमता सिद्ध करणे हेच खरे नेतृत्व असून, केवळ आरक्षणामुळे नव्हे तर आपल्या अंगभूत गुणवत्तेमुळे आपण पुढे येतो, हे प्रत्येक महिलेला दाखवून द्यावे लागेल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देत, त्यांनी घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभागाच्या सहकार्याने शिबिरे आयोजित करण्याची तयारी असल्याचे सांगितले.
याशिवाय ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा महिलांना घरमालकाच्या प्रमाणपत्राच्या आधारे ओळख निश्चितीची प्रक्रिया करून देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने २५ मेनंतर रक्त तपासणी, कॅल्शियम तपासणी, डोळे तपासणी, कॅन्सर तपासणी अशा मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत. शरीरात लोह व कॅल्शियमची कमतरता असणाऱ्या महिलांना औषध वाटप देखील केले जाणार आहे. प्रत्येक महिला कार्यकर्तीने आपल्या भागातील महिलांची नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सरकारी दाखल्यांसाठी महसूल शिबिरे आयोजित करून मोफत सेवा दिली जाणार आहे. ही संकल्पना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची असून तिच्या अंमलबजावणीबाबतही डॉ. गोऱ्हे यांनी सकारात्मक भूमिका मांडली.
“प्रत्येक महिला आदर्श ठरावी आणि समाजात परिवर्तन घडवावे,” असे म्हणत त्यांनी महिलांना नेतृत्वाची दिशा दिली.
या मेळाव्यात माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख राजू कापसे, सह संपर्कप्रमुख भास्करराव लंगोटे, युवा सेना प्रमुख आप्पाराव वावरे, संपर्कप्रमुख सखुबाई लटपटे, महिला प्रमुख गीता ताई सूर्यवंशी, तालुका प्रमुख प्रभू कदम, प्रल्हादराव होगे, माणिक पोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
या महिला मेळाव्याच्या माध्यमातून परभणीत सशक्त, सजग व संघटित महिला नेतृत्व उभे राहण्याची सुरुवात झाली आहे, असे चित्र संपूर्ण कार्यक्रमातून दिसून आले.