राष्ट्रभक्तीची उत्स्फूर्त अभिव्यक्ती

पुणे – जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आज रविवार, 18 मे रोजी पुण्यात ‘तिरंगा यात्रा’चे आयोजन करण्यात आले. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक येथून ज्ञानेश्वर पादुका चौकात समारोप सभा झाली.
पावसाच्या सरींना न जुमानता, हातात तिरंगा घेऊन, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘दहशतवाद मुर्दाबाद’ अशा घोषणांनी पुणेकरांनी रस्ते गाजवले. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांनी कुटुंबासह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मोहोळ म्हणाले, “आता दहशतवाद सहन केला जाणार नाही. शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताची भूमी आणि अस्मिता सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिक सज्ज आहे. ज्या प्रकारे पाकिस्तानवर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले त्याच प्रकारे या पुढील काळात दहशतवाद संपवला जाईल.”
घाटे म्हणाले की, “ही यात्रा केवळ एक विरोध नाही तर आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली देण्याची सामूहिक भावना आहे. समाज म्हणून एकत्र येऊन आपले कर्तव्य बजावण्याचा हा प्रयत्न आहे.”
या यात्रेत सहभागी होताना गनबोटे आणि जगदाळे कुटुंबांनी स्वतःच्या दुःखावर मात करत समाजासाठी एकत्र उभे राहण्याचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. त्यांच्या देशभक्तीने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले.

एअर मार्शल बापट यांच्या प्रतिकात्मक संदेशात नमूद करण्यात आले की, “आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण प्रणालीत ब्रह्मोस, आकाश आणि आकाश तीर क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे. देशाला हात लावणाऱ्यांना आता योग्य उत्तर मिळते.”
या तिरंगा यात्रेत केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे , राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी , समाज कल्याण राज्य मंत्री माधुरी मिसाळ ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे,भीमराव तापकीर ,हेमंत रासने , सुनील कांबळे , योगेश टिळेकर ,माजी आमदार जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले,संदीप खर्डेकर, सरचिटणीस पुनीत जोशी ,राघवेंद्र मानकर , सुभाष जंगले, राहुल भंडारे ,प्रमोद कोंढरे, वर्षा तापकिर,गणेश कळमकर रवींद्र साळेगावकर यांच्या सह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

