मुंबई:
शिवसेना-भाजप युतीत दरी निर्माण होण्यास भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा ठपका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठेवला आहे. “अमित शहा दिल्लीच्या राजकारणात आल्यापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा वाढला. स्व. अरुण जेटली यांनीही शहा यांना दोनदा समजावले होते की, शिवसेनेशी वागणुकीत सावधगिरी बाळगा,” असा गौप्यस्फोट राऊतांनी केला.संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, “अरुण जेटली रुग्णालयात असताना अमित शहा त्यांना भेटायला गेले. तेव्हा जेटली म्हणाले होते – शिवसेना हा आपला जुना सहकारी पक्ष आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्या सोबत राहायला हवे. ही माहिती मला स्वतः जेटलींनी दिली होती.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे किंवा अन्य विरोधी पक्षांची संबंध कधीही वाईट नव्हते. अमित शहा दिल्लीच्या राजकारणात आल्यानंतर हे सर्व सुरू झाले. अमित शहांचे काम म्हणजे विरोधकांना ‘खतम करा’ असे आहे. आपली सत्ता बळकट करण्यासाठी त्यांनी अतिशय निर्घृण पद्धत वापरली. ही या देशाची लोकशाही किंवा राजकीय संस्कृती नाही अशी व्यवस्था देशात कधीही नव्हती, असेही राऊत यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
भाजपमध्ये आलेली मंडळी तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत होती:
संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आले तेव्हा तिथे मी उपस्थित होतो त्यांचे फोटो आहेत. पण आता जे भाजपचे लोकं आहेत ते तेव्हा नव्हते असा टोला भाजपच्या नेतृत्वाला राऊतांनी लगावला आहे. काल भाजपमध्ये आलेली पोरं ही तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होती. त्यांना काय माहिती शिवसेना-भाजपचे काय नाते होते.
माझ्या अटकेपूर्वी कुटुंबीयांना त्रास दिला:
संजय राऊत म्हणाले की, मला अटक करण्यापूर्वी माझ्या निकटवर्तीय लोकांना त्रास देण्यात आला. ईडीच्या अटकेआधी मी गृहमंत्री अमित शहांना फोन करत सांगितले होते कुटुंबियांना त्रास देण्यापेक्षा मी दिल्लीतील माझ्या बंगल्यावर आहे तिथून मला अटक करायची असेल तर करा. पण लोकांना त्रास देण्याची नौटंकी थांबवा. मी अमित शहांचा फोन ठेवला आणि आशिष शेलार यांचा मला फोन आला. मी शेलारांना सांगितले मला त्रास द्या मी तुमच्याशी लढायला समर्थ आहे. पण ज्या लोकांचा याशी काही संबंध नाही त्यांना त्रास देऊ नका. त्यावेळी ईडीचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही सर्व माहिती देत होते.
अटकेपूर्वी सीएम शिंदेंचा फोन आला होता: संजय राऊत म्हणाले की, मला ईडी अटक करणार होती त्यापूर्वी मला एकनाथ शिंदेंचा फोन आला होता. मी अमित शहा यांच्याशी बोलू का? असे शिंदेंनी मला विचारले होते. तुम्ही वर बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही हे मी शिंदेंना तेव्हाच स्पष्ट केले होते. मी वर बोलायला समर्थ आहे, तुम्ही बोलायची काही गरज नाही. मी पळून जाणार नाही, होऊ द्या मला अटक असे मी शिंदेंना सांगितले होते.

