राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजाची म्हणून महाराष्ट्रात खोटी वाघनखे आणली आणि त्याचे प्रदर्शन केले. या प्रकरणी सरकारने करदात्यांच्या पैशांचा गैरवापर केला, अशी टीका वकील असिम सरोदे यांनी शनिवारी सरकारवर निशाणा साधताना केली आहे.
असिम सरोदे सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी तेथील अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्यूझियमला भेट देऊन एका व्हिडिओद्वारे सरकारवर उपरोक्त आरोप केला. सरकारने आणलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत. सरकारने ती शिवाजी महाराजांची म्हणून महाराष्ट्रात खोटे प्रदर्शन केले. लोकांच्या टॅक्समधून जमवलेल्या लोकनिधीचा गैरवापर केला. हे सर्व घडत असताना आपण केवळ बघत राहिलो, असे ते म्हणाले.
ती वाघनखे खरेच महाराजांची आहेत का?
असिम सरोदे आपल्या एका व्हिडिओ पोस्टमध्ये म्हणाले, आम्ही अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया मेमोरियल म्यूझियममध्ये उभे आहोत. महाराष्ट्र व भारताच्या विषयाशी संबंधित एका महत्त्वाच्या मुद्यासाठी इथे लंडनमध्ये आलो आहोत. म्यूझियममला हा कोपरा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मुघल व मराठा साम्राज्याच्या काळात ज्या काही लढाया व युद्ध झाले किंवा शस्त्रास्त्र वापरण्यात आले ते इथे ठेवण्यात आलेत. शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा वध केला ती वाघनखे येथे होती असे आपल्याला सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने काही कोटी रुपये खर्च करून ती वाघनखे 3 वर्षांसाठी आपल्या ताब्यात घेतली आहेत असे सांगण्यात आले.
आता मुळात ही वाघनखे खरेच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती का? याविषयी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी फार चांगले विश्लेषण केले आहे. मी काही इतिहासकार नाही. पण तरीही अभ्यासू लोकं काहीतरी सांगत असतात तेव्हा आपण काही गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे. लॉर्ड एल्फिन्स्टन आणि ग्रँड डफला सातारच्या प्रतापसिंह छत्रपती यांनी वाघनखे भेट दिली. त्यांनी सुद्धा ही वाघनखे शिवाजी महाराजांची आहेत असा दावा केला नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सातारा छत्रपतींकडे आहे असे त्या प्रत्यक्षदर्शींनी लिहून ठेवले आहे. याच अस्सल वाघनखांसारखी दिसणारी वाघनखे प्रतापसिंह यांनी मला भेट दिली असे एल्फिन्सनसारखा भारताचा इतिहास लिहिणाला माणूस सांगतो. यावर आपण विश्वास ठेवायचा की नाही? असा प्रश्न इंद्रजित सावंत यांनी विचारला आहे.
वाघनखांनी लोकांच्या जिवनात काय फरक पडला?
असिम सरोदे पुढे म्हणाले, व्हिक्टोरिया अल्बर्ट म्यूझियममध्ये यासंबंधी लावण्यात आलेल्या फलकावर ‘क्लेम’ असा शब्द लिहिण्यात आला आहे. या म्यूझियमच्या 22 व्या क्रमांकावर सरकारने आणलेली वाघनखे ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी ही वाघनखे शिवाजी महाराजांची असल्याचे, पण त्याचवेळी अनेकांनी असा दावा केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने ही वाघनखे आपल्या सर्वांच्या करामधून गोळा झालेल्या पैशांचा वापर करून ही वाघनखे महाराष्ट्रात आणली आहे. पण ही वाघनखे खरी नसल्याचा दावा सर्व इतिहासकार करत आहेत. वाघनखे महाराष्ट्रात नेल्यानंतर लोकांच्या जिवनात फार काही फरक पडेल असेही नाही. मग कोट्यवधी रुपये खर्च करून या म्यूझियमची कमाई का करून देण्यात आली? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे सजग नागरिकांनी व शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी येथील वाघनखे भाड्याने महाराष्ट्रात प्रदर्शन करण्यासाठी का नेले? असा प्रश्न केला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज जानते राजे होते. कारण, ते जनतेचा पैशांचा गैरवापर कधीही होऊ देत नव्हते. शेवटचा पैसा सुद्धा लोकांच्या उपयोगासाठी व विकासासाठी वापरला पाहिजे असे समजणाऱ्या शिवाजी महाराजांचे धोरण व विचार या लोकांना पाळता येत नाही. हे लोक इथले कुणाचे तरी नकली वाघनखे घेऊन महाराष्ट्रात जातात व तिथे सांगतात की आम्ही शिवाजी महाराजांवर प्रेम करतो म्हणून ते आणले आहेत. ते विकत घेतले असते तर आपण समजू शकलो असतो. पण भाड्याने 3 वर्षांसाठी इथून नेलेत. त्यासाठी एक मोठी रक्कम नागरिकांच्या करांतून द्यावी लागली. याचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे, असे असिम सरोदे यांनी म्हटले आहे.

