भाजप करतय पुणेकरांची दिशाभूल .. पुन्हा तेच ते आणि तेच …
पुणे- आज महापालिकेत अचानक भाजपच्या केंद्रीय राज्य मंत्री यांच्या नेतृत्वाखाली काही माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना बैठक घेऊन धारेवर धरण्याचे नाट्य केवळ निवडणुका समोर दिसू लागल्याने रंगविले असून आजपर्यंत ते केवळ टेंडर साठी महापालिकेत चकरा मारीत होते असा आरोप शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे .
ते पुढे म्हणाले,’ नाले सफाईत हात की सफाई नको. असे आयुक्तांना व प्रशासनाला खडसावून सांगणारे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी २०० कोटी निधी पुण्यातील ओढ्यांच्या सीमाभिंती बांधण्यासाठी आणला म्हणून संपूर्ण पुण्यात बॅनरबाजी केली होती. शेवटी तो निधी महाराष्ट्र सरकारकडून आलाच नाही. म्हणजे कोण कोणाला फसवत आहे ? नागरिकांना निवडणुकीत फसवायचे निवडून आल्यावर अधिकाऱ्यांना झापायचं मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, असा खेळ प्रशासन आणि भाजप सत्ताधारी करीत आहेत. ही पुणेकरांची दिशाभूल आहे. पहिल्याच अवकाळी पावसाने सगळ उघडं पडल, आणि महापालिका निवडणूका डोळ्यासमोर दिसतायत, त्यामुळे काहीतरी करतोय हे दाखविण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न दिसतो आहे. इतके दिवस फक्त स्वतःसाठी निधी आणि टेंडरसाठीच चकरा मारणारे भाजपचे नगरसेवक आत्ता अचानक प्रशासनाला धारेवर धरतायत. दिल्ली पासून गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे. महापालिकेमधे प्रशासक यांच्याच सत्ताकाळात आहे. मागील आठ वर्षापासून भाजपची सत्ता पुणे महापालिकेत आहे. महापौर ते खासदार आणि केंद्रीय मंत्री या प्रवासात पुणेकरांच्या प्रश्नांचा विसर पडल्याने आता एकूणच पुण्याचं नेतृत्व करायचं आहे ? अस आजच्या बैठकीतून दिसत आहे. काही कोटीचे टेंडर लागूनही पुण्यातील ओव्हरहेड केबल भूमिगत करण्याचे काम अद्यापही झालेले नाही. भाजपच अस झालय नाचता येईना आणि अंगण वाकडं म्हणायच. जनतेची दिशाभूल करायची. आता ते शक्य नाही. पुणेकर सूज्ञ आहेत. अबकी बार भाजपा हद्दपार …होईल अशीच आता स्थिती आहे.

