उपकाराची फेड अपकाराने करणारी लोकं..यापेक्षा असंख्य घटनेचा मी साक्षीदार, मात्र त्या सांगणार नाही
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाने लोफर व्यक्तींच्या हातात दिला. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकात लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. तो सत्य आहे, ती कादंबरी नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
या माध्यमातून संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. नरकातला स्वर्ग या पुस्तकातील प्रत्येक घटना आणि प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. ती कादंबरी नाही. ते सर्व प्रसंग सत्य असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने कपोलकल्पित कथा सांगतात, त्याप्रमाणे मी पुस्तक लिहिलेले नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही कोणाच्या हातात दिली? एका लोफर माणसाच्या हातात ती दिली? त्यांचा राजकारण त्यांच्यापाशी मात्र ते शिवसेनेचे मालक कसे बनवू शकतात? तुम्ही कोण आहेत? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले. चौकटीच्या बाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी तुम्हाला मदत केली. त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले. हे त्यांना शोभले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला आहे. याविषयी मी आतापर्यंत कधीही बोललेलो नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. काही गोष्टी गोपनीय असतात त्या गोपनीय राहायला हव्यात, असे देखील ते म्हणाले.
नरकाचा स्वर्ग या पुस्तकात माझे तुरुंगातील अनुभव असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कशी मदत केली, हे मला तुरुंगात असताना आठवले. त्यामुळे त्याचा उल्लेख देखील यामध्ये असल्याचे ते म्हणाले. पुस्तकातून तुरुंगातील अनुभव सांगितले असल्याचे देखील त्यांनी म्हणाले आहे. वरिष्ठ लोकांसोबत काही सिक्रेट गोष्टी आम्ही पाहिल्या आहेत. त्या गोष्टी पुस्तक रूपाने सर्वांसमोर आणणे योग्य नाही, असे मला वाटते. मात्र पुस्तकांमध्ये मी केवळ एकच संदर्भ दिला आहे. शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे या प्रमुख महाराष्ट्रातील नेत्यांचे राजकारण पाहता मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता, या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडण्यात आले. तसेच पक्ष संपवण्याचा वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. उपकाराची फेड अपकाराने कशी केली, याचाच उल्लेख यात संजय राऊत यांनी केला आहे.
आजचे भाजपचे नेते बोलत आहेत त्यांना काय माहिती? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो. मात्र मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळली आहे. मर्यादेत राहील तेवढेच या पुस्तकात लिहिले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यापेक्षा असंख्य घटनेचा मी साक्षीदार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मी प्रदीर्घकाळ बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेलो आहे. त्यामुळे अनेक गोष्टी मला माहिती आहे. मात्र मी त्या कधीही लिहिणार नाही आणि बोलणार देखील नाही. मात्र ‘नरकातला स्वर्ग’ हा वेगळा प्रवास आहे. तो तुरुंग आहे आणि त्यानिमित्ताने तुरुंगाची भिंतीशी आपण बोलतो. त्यावेळी आपल्याला अनेक संदर्भ आठवत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो. घाबरून पळून जावे लागत नाही, असा टोला देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे.

