अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये घ्यायला तयार नाहीत
आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी धोका निर्माण केला-काँग्रेसने खुलासा न मागता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागायला हवा, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसलाही सुनावले आहे. एक प्रधानमंत्री देशाशी खोटे बोलत आहे आणि आपल्या सैनिकांचे पाय खेचून त्यांना मागे घ्यायचे काम करत आहे. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी धोका निर्माण केला आहे. ते आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोट्या खेळत आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
मुंबई- अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये घ्यायला तयार नाहीत. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर खोचक टोला लगावला आहे. या संबंधी ते म्हणाले की, शरद पवार यांचा पक्ष मूळ पक्ष आहे. ते अजित पवार यांच्या गटात कशासाठी जातील? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मोदी – शहा गेल्यानंतर यांच्याकडे काहीही राहत नाही. त्यामुळे हे दिवस निघून जातील, असा सल्ला देखील त्यांनी शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांना दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच देशाच्या राजकारणातून बाजूला होतील, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. त्यांना देशातील राजकारणातून जावे लागेल. फक्त माझे पुस्तक येण्याची वाट पहा. त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. माझे पुस्तक आल्यानंतर अमित शहा यांच्या अध:त्पतनाला सुरुवात होणार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपच्या वतीने काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रेवरही त्यांनी निशाणा साधला. तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. जागतिक युद्धाच्या इतिहासात पहिल्यांदाच शस्त्रसंधी झाल्यानंतर अशा प्रकारे आनंद साजरा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. युद्ध विराम आणि माघार घेत, शस्त्रसंधी करून हाच विजय मानून एक पक्ष विजयी सोहळा साजरा करत आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. शस्त्र संधी हा विजय कसा असू शकतो? दुसऱ्यांच्या हस्तक्षेपाने झालेली शस्त्र संधी हा विजय कसा असू शकतो? असे प्रश्न राऊत यांनी विचारले आहेत.
या वेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी देखील तिरंगा यात्रा काढली होती. यावरुन त्यांचे डोके फिरले आहे का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. तुमच्या माघारी मुळे युद्ध विरामामुळे अख्खा देशाला धक्का बसला आहे. तुमच्या अशा धोरणामुळे अख्खा देश धक्क्यात असताना एकनाथ शिंदे यांनी तिरंगा यात्रा नाही तर डोनाल्ड यात्रा काढायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला. शिंदेंनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यायला हवा, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

