नाशिक- राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी पक्ष सोडला तेव्हा पक्षावर दावा केला नाही. या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापन केला. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मात्र, पक्ष पळवला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.
अजित पवार हे अमित शहा यांच्या मदतीने शरद पवार यांचा पक्ष पळवून घेऊन गेले आहेत. मी या बाबतीत नेहमीच दोन नेत्यांचे कौतुक करतो. त्यातील एक नारायण राणे यांनी पक्ष सोडला आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांना पक्ष चालवायला जमला नाही, त्यामुळे ते दुसऱ्या पक्षात गेले. दुसरे राज ठाकरे यांनी देखील स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांचे आणि आमचे मतभेद झाले मात्र, त्यांनी स्वतःचा पक्ष काढून राजकारण केले. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे त्यांनी शिवसेना माझीच आहे, असे कधी सांगितले नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात आणि नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यात हा फरक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे स्वागत तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याला संजय राऊत विरोध करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात संजय राऊत यांनी हे उत्तर दिले आहे. राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे. तेथे कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते, अशीच परिस्थिती आहे. मात्र त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नये, ही आमची अट असल्याचे मी म्हणणार नाही. मात्र ही अपेक्षा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत राहावे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्र सांभाळावा हे त्यांचे पहिल्यापासूनच ठरलेले आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे पहिल्यापासूनच दिल्लीमध्ये काम करत आहे. मात्र दिल्ली सांभाळण्याची जबाबदारी अजित पवार यांनी आता दाऊद इब्राहिम म्हणजेच भ्रष्ट प्रफुल्ल पटेल यांना दिली आहे. त्यांना राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. ते आता काम पाहत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा प्रश्नच येत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा आहे तर अजित पवार यांचा हा फुटलेला गट असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. तसेच मूळ शिवसेना ही देखील उद्धव ठाकरे यांची आहे. तर एकनाथ शिंदे यांचा गट आहे. अमित शहा यांनी ठरवले म्हणून लोक ते स्वीकारणार नाहीत, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.
ईव्हीएमची तयारी झाल्यानंतर सरकार निवडणुका जाहीर करेल-सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सरकारने लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात. आमची पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मात्र सरकारच्या वतीने अद्याप ईव्हीएमची तयारी झालेली दिसत नाही. त्यांची ईव्हीएमची तयारी पूर्ण झाल्यानंतर ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करतील, असे वाटत असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे. सर्व जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महा विकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढण्याची तयारी करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
राज्यात ज्या-ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे, त्या- त्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महा विकास आघाडी म्हणून लढणार आहे. यामध्ये काही शंका नाही. काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये वेगळे लढण्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र शक्य तेवढ्या जिल्ह्यामध्ये आम्ही एकत्र लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षांमध्ये उत्तम संवाद सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही एकत्र लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जवळपास सर्वच महानगरपालिका आम्ही एकत्रच लढायला आमची हरकत नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

