- पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. तिकीट जवळपास दुटीने वाढल्याने असल्याने प्रवास महागणार असला तरी दोन किलोमीटरच्या टप्प्याऐवजी पाच किलोमीटरचा टप्पा असणार आहे.
- त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासाही मिळणार आहे.
पीएमपीचा संचलनातील तोटी दरवर्षी जात असून, गेल्यावर्षी तब्बल ७६६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. पीएमपीने गेल्या ११ वर्षात तिकीट दरवाढ केलेली नव्हती, त्यातुलनेत पगार, सीएनजी, डिझेल व देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून तिकीट दरवाढीसंदर्भात चर्चा होती.
आज अखेर संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पीएमपीची सेवा ही पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीमध्ये दिली जाते. रोज १२ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.
पाच ऐवजी १० रुपये तिकीट
यापूर्वी पीएमपीचे पहिल्या टप्प्यासाठी सर्वात कमी तिकीट हे पाच रुपये होते. पण आता सर्वात कमी तिकीट हे १० रुपये असणार आहे. पहिला टप्पा हा पाच किलोमीटरचा असणार आहे. पूर्वी हा दोन किलोमीटरचा टप्पा होता. पाच किलोमीटरसाठी १० रुपये तिकीट असणार आहे.
४२ ऐवजी ११ टप्पे
यापूर्वी पीएमपीचे ४२ टप्पे होते, हे टप्पे कमी करून केवळ ११ केले आहेत. अंतर वाढविल्याने टप्पे कमी झाले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा लांबचा प्रवास करणाऱ्यांना होणार आहे. यापूर्वी १ ते ७८ किलोमीटरसाठी २ किलोमीटरच्या अंतराने १ ते ४० पर्यंत टप्पे होते.
नव्या निर्णयानुसार १ ते ३० किलोमीटर अंतरासाठी ५ किलोमीटरच्या अंतराने ६ टप्पे केले आहेत. त्यापुढे ३० ते ८० किलोमीटरच्या अंतरासाठी १० किलोमीटरच्या अंतराने ५ टप्पे असे एकूण ११ टप्पे केले आहेत. या टप्प्यानुसार तिकिटाची रचना केली आहे.
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या पासमध्ये बदल नाही
तिकीट दर फेरबदलामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसाठी प्रचलित असलेल्या दैनिक पास ४० रुपये (एक महापालिका हद्दीसाठी) आणि मासिक पास ९०० रुपये (एक महापालिका हद्दीसाठी) असा होता. आता दोन्ही महापालिकांसाठी एकच पास असणार आहे. पण त्याचा दर वाढला आहे.
दैनिक पास ७० रुपये व मासिक पास १,५०० रुपयांचा असणार आहे. पीएमआरडीएच्या हद्दीसाठी दैनिक पास १२० रुपये ऐवजी १५० रुपयांचा असणार आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांच्या दैनंदिन व मासिक पासच्या दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही.
अशी आहे दरवाढ
प्रस्तावित स्टेज- प्रस्तावित किलोमीटर.. – प्रस्तावित दर रुपये – ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी दर
१ – १ ते ५ -१० – ५
२ – ५.१ ते १० – २० – १०
३ – १०.१ ते १५ – ३० – १५
४ – १५.१ ते २० – ४० – २०
५ – २०.१ ते २५ – ५० – २५
६ – २५.१ ते ३० – ६० – ३०
७ – ३०.१ ते ४० – ७० – ३५
८ – ४०.१ ते ५० – ८० – ४०
९ – ५०.१ ते ६० – ९० – ४५
१० – ६०.१ ते ७० – १२० – ६०
११ – ७०.१ ते ८० -१२० – ६०
‘पीएमपीने तिकीट दरात वाढ करताना, प्रवासाच्या टप्प्यांचे अंतर वाढवले आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाच्या पासच्या दरात वाढ केलेली नाही. ११ वर्षानंतर ही तिकीट दरवाढ केली आहे.’
- दीपा मुंडे-मुधोळ, व्यवस्थापकी संचालक, पीएमपी

