पुणे : गजा मारणे कैदेत असताना त्याची मटण पार्टी झोडणाऱ्या पुणे पोलिस दलातील १ अधिकाऱ्यासह ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. गजा मारणेला पुण्याहून सांगली कारागृहात घेऊन जाताना मारणे याने पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.मकोकाचा आरोपी असूनही ढाब्यावर पोलिस व्हॅन थांबवून त्याला मटण खाऊ दिल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे पुणे पोलिसांवर प्रश्नचिह्न उभे राहिले होते.
या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु यासह हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, पोलिस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आळे आहे. मोक्का कारवाई अंतर्गत गजा मारणे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला सांगली तुरूंगात नेण्यात येत होते
गजा मारणेला पुण्यातील येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला घेऊन पोलीस व्हॅन सहाय्यक पोलिस निरीक्षक व चार पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सांगलीच्या दिशेने निघाली. मात्र थेट कारागृहात पोहोचण्याआधी साताऱ्यात असलेल्या ढाब्या वर व्हॅन थांबली पोलिस कर्मचाऱ्यांनी तिथे जेवण केले.
दरम्यान पोलीस व्हॅनच्या मागावर असलेल्या मारणे टोळीची गाडी सुद्धा त्याठिकाणी येऊन थांबली. मारणेच्या गॅंगच्या गुंडांनी ढाब्या मधून एक मटण प्लेट आणली आणि थेट व्हॅन मध्ये बसलेल्या मारणे याला दिली. ही सगळी घटना ढाब्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पुणे पोलिस आयुक्तांना प्रकार समजला आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची तपासणी करण्यासाठी सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यातून ही मटण पार्टी झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.
पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी ही यानंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. तर गुंड गजा मारणेला ढाब्यावर भेटलेल्या सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ तसेच बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.

