पुणे – पुण्याला आज कोणा पुण्याच्याच नेत्याचे नेतृत्व उरलेले आहे असे दिसत नाही. सुरेश कलमाडी हे पुणे शहराचे अखेरचे नेतृत्व मानावे लागते.कलमाडी पुण्याचे नेते असतानाच अजित पवारांना पुण्याचे नेतृत्व करण्याची इछ्या होती आणि ते त्या स्पर्धेत उतरले देखील.पण कलमाडी आणि त्यांचे वारंवार खटके उडत. कलमाडी यांच्याशी जमवून घेण्याची शरद पवार यांची सूचना मानून अजित पवारांनी सपत्नीक कलमाडी हाउसला जाऊन स्नेह भोजन देखील केले.या राजकीय ऐतिहासिक घटनेची अनेक जाणकारांना माहिती असेल. पण पुढे दिवस बदलले, ज्या BRT च्या नावाने अजित पवारांनी कलमाडींचे नेतृत्व बदनाम केले, महापालिकेत सत्ता प्राप्तीसाठी मोठे बळ त्यावरच मिळविले ती BRT त्यांनी सत्ता प्राप्ती नंतरही सुरूच ठेवली.अखेरीस कलमाडी राष्ट्रकुल घोटाळ्यात अडकले आणि ९ महिन्याचा आजामिनपात्र तुरुंगवास त्यांनी भोगला.वर्षानुवर्षे त्यांच्यावर हा डाग राहिला,राजकीय पटलावरून त्यांचे नाव पुसले गेले.ते शाररीक,मानसिक दृष्ट्या कमजोर पडल्यावर तब्बल १५ वर्षांनी त्यांच्यावरील आरोप मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली .तोवर कलमाडी यांच्या नेतृत्वाचा अस्त झाला होता.
त्या पूर्वी पुण्यात विठ्ठलराव गाडगीळ आणि जयंतराव टिळक असे २ नेते होते. दोघे कॉंग्रेसचेच.पण शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांना शह देत त्यांचा राजकीय आखाडा रंगवायला सुरेश कलमाडींना आणले.कलमाडी यांनी आगळ्या वेगळ्या राजकारणाचा प्रारंभ केला आणि संपूर्ण राजकारणाची दिशा बदलून टाकली. गाडगीळ यांचा गट टिकून ठेवण्यात प्रकाश ढेरे यांचा सिंहाचा वाटा होता.जयंतराव टिळकांच्या गटाची धुरा अजित आपटेंनी कायम वाहिली.पण ती त्यांच्या एकटयापुरती ठरत गेली.गाडगीळ,टिळक हे दोन्ही गट संपल्यावर कलमाडींची पुण्यावर एक हाती प्रचंड शक्तिशाली नेतृत्वाची वज्र मुठ कायम राहिली.
कलमाडींच्या नेतृत्वाचा अस्त झाल्यावर पुण्यातील कॉंग्रेस मध्ये दलित नेता म्हणून केवळ रमेश बागवे एवढेच काय ते उरले होते..बागवे,दीपक मानकर जे कधी काळी कलमाडी यांचे कवच मानले जात.पण तत्पूर्वीच कलमाडी यांनी अध्यक्षपद नाकारून,डावलल्याने मानकर पक्ष सोडून बाहेर पडले होते.मोहन जोशी, शरद रणपिसे,बाळासाहेब शिवरकर,उल्हास पवार असे अनेक नेते कॉंग्रेस मध्ये होते.पण कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि शक्ती किंवा कार्यकर्त्यांचा समूह असलेले नेते केवळ बागवे आणि मानकर आणि आबा बागुल एवढेच नेते होते.पण बागवे आणि बागुलांना केवळ आपल्या विधानसभा मतदार संघातच रस होता.आणि मानकर पक्षा बाहेर पडले होते, हर्षवर्धन पाटलांचे नाव तेव्हा पुढे आले होते पण तेही भाजपात गेले.त्यामुळे कलमाडी यांच्या नेतृत्वाचा अस्त झाल्यावर कॉंग्रेस ने सामुहिक नेतृत्वाची कल्पना मांडली,नेते वीस पण कार्यकर्ते कासावीस अशी अवस्था तेव्हाच कॉंग्रेसची झाली, आणि भाजपा गिरीश बापटांच्या नेतृत्वाखाली बळकट होत गेला.भाजपा मध्ये अण्णा जोशी, अरविंद लेले यांच्या नंतर गिरीश बापट आणि अनिल शिरोळे हे दोघे नेते शक्तिशाली होत गेले.आणि पुढे भर म्हणून संजय काकडे देखील भाजपला मिळाले. पुण्यात महापालिकेची सत्ता प्रस्थापित करण्यात काकडे यांचे मोठे सहाय्य भाजपने मिळविले. आणि बापट कि काकडे कि शिरोळे यांच्यातील कोणाकडे पुण्याचे नेतृत्व असा प्रश्न सातत्याने उपस्थित झाला.पण ना बापटांना शहराचे नेतृत्व मिळू दिले गेले.,ना काकडे यांना,ना शिरोळे यांना..शिरोळे यांनी आपल्या मुलाच्या राजकीय कारकिर्दीला महत्व दिले.पण बापटांनी जीवात जीव असेपर्यंत लढा दिला.त्यांचे निधन झाल्यावर आणि पुण्यातून भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ झाल्यावर ते केंद्रात मंत्री देखील झाले.पण..पुण्याचे नेतृत्व..मात्र ते अजूनही स्वतः कडे मिळवू शकलेले नाहीत.आता महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पूर्वीप्रमाणे पुण्याच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत कार्यकर्ते एकत्रीत ठेवण्याची कला अवगत असल्याने दीपक मानकर यांचे नाव सारखे सारखे पुढे येत राहिले.आणि मानकर यांना त्यामुळे कायम संघर्षाचा सामना करावा लागला.आजही याच संघर्षात अडकून त्यांची पीछेहाट केली जाते कि काय असा प्रश्न साहजिकच कार्यकर्ते विचारू लागले.पुण्याच्या नेतृत्वाच्या गणतीत महापालिकेला मोठे महत्व असल्याचे मानले जाते.आणि महापालिकेची निवडणूक होणार असेल तर पुण्यातून कोणता नेता जास्त नगरसेवक निवडून आणून देऊ शकतो असा प्रश्न साहजिक निर्माण होतो.जो नेता सर्वाधिक नगरसेवक आपल्या नेतृत्वाच्या कौशल्याने, राजकीय रणनीतीने निवडून आणू शकतो साहजिक त्याच्याकडे पुण्याचा नेता म्हणून पहिले जाऊ शकते .पण सध्याची राजकीय स्थिती मोठी अस्थिर, म्हणजे पुण्याच्या नेतृत्वासाठी अजूनही अस्थिरच आहे. पुण्याला पुण्याचे नेतृत्व मिळू द्यायला मुंबईत किंवा दिल्लीत बसलेल्या बड्या हस्ती तयार नसाव्यात.असे वाटणारी आहे.
शेवटी प्रश्न अनुत्तरीतच राहतो..आजही कलमाडी यांच्यानंतर पुण्याचे नेतृत्व कोणाकडे? असा प्रश्न जेव्हा जेव्हा पुढे येईल..तेव्हा तेव्हा सामुहिक…असे उत्तर दिले जाईल,म्हणजेच नेते वीस आणि कार्यकर्ते कासावीस हीच स्थिती पुण्यात कायम राहील असे दिसते आहे.आणि पुण्याची धुरा मुंबईत ज्याची सत्ता असेल त्याच सत्ता प्रमुखाच्या हाती कायम राहील कि काय,पुण्याला पुण्याचे नेतृत्व लाभणारच नाही कि काय ? असे प्रश्न पुन्हा पुन्हा पुढे उभे ठाकत राहतील.

