मुंबई-देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बी आर गवई यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली. तत्पूर्वी, त्यांच्या मातोश्री कमला गवई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ईव्हीएमपेक्षा बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे केव्हाही चांगले असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.देशातील काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष देशात मतपत्रिकेवर अर्थात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. त्यातच अमेरिकन गुप्तहेर संघटनेने ईव्हीएम हॅक होऊ शकते असे निरीक्षण नोंदवल्याने भारतातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या मातोश्री कमला गवई यांना ईव्हीएमच्या मुद्यावर नव्या सरन्यायाधीशांनी एखादा निर्णय घेतला पाहिजे का? असा प्रश्न केला होता. त्यावर बोलताना कमला गवई यांनी आपले वरील प्रांजळ मत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, मी नव्या सरन्यायाधीशांची आई आहे. पण तो त्या खुर्चीत बसल्यानंतर त्याला योग्य वाटेल तोच निर्णय घेईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तुम्हाला काय सांगणार आहे हे माहिती आहे. पण तुमची इच्छाच असेल तर बॅलेट पेपर केव्हाही चांगले आहे. पूर्वी देखील बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायच्या.
कमला गवई यांनी यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या बालपणीच्या आठवणीही सांगितल्या. घरातील ज्येष्ठ मुलगा असल्यामुळे भूषण लहान वयातच परिपक्व झाला. 1971 साली झालेल्या भारत-पाक युद्धावेळी अमरावतीच्या फ्रेजारपुरा भागात आम्ही सैनिकांसाठी भाकऱ्या बनवायला मदत केली होती, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना आज आपल्या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
न्यायमूर्ती भूषण गवई यांचे वडील रा.सू. गवई हे आंबेडकरी चळवळीतील काही प्रमुख नेत्यांपैकी एक होते. त्यांनी अमरावतीच्या खासदारकीसह बिहार, सिक्कीम व केरळ राज्याचे राज्यपालपदही भूषवले होते.

